Dombivli Doctor Assault Case Pudhari
ठाणे

Dombivli Doctor Assault Case: काका... थांबा, मला मारू नका...! महिला डॉक्टर भीतीखालीच

शास्त्रीनगर रुग्णालयातील नगरसेवक रमेश म्हात्रेच्या मारहाणीची अजूनही जाणवतेय दहशत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असताना नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रेकडून झालेल्या मारहाणीला बळी पडलेल्या डॉ. सृष्टी बाविस्कर अजूनही धक्क्यातून सावरलेल्या नाहीत.

रात्री झोपेतून दचकून उठतात. काका... थांबा मला मारू नका... अशी आर्त किंकाळी फोडत त्या जाग्या होत असल्याची धक्कादायक माहिती त्यांचे वडील डॉ. महेंद्र बाविस्कर यांनी दिली. डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंके यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रासह कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये अद्यापही संतापाची भावना आहे.

या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डॉ. महेंद्र बाविस्कर यांनी या साऱ्या घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर बोलताना केली. माझ्या मुलीकडे मुंबईतील एका मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी होती. पण तिने सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांची सेवा करायची म्हणून केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाची निवड केली.

सेवाभावाने काम करणाऱ्या मुलीलाच जर असा मारहाणीचा अनुभव येत असेल, तर समाजाने याचा गंभीर विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. डॉ. महेंद्र बाविस्कर यांनी सांगितले की, आम्हाला कोणतीही व्हीआयपी वागणूक नको. कायद्यापुढे सर्व समान आहेत. पण, आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात कुणालाही डॉक्टरांवर हात उचलण्याचे धाडस होणार नाही.

उपाययोजना व्‍हाव्‍यात : डॉक्टरांविषयी काही तक्रार असेल तर चौकशी करा, तक्रार करा, निलंबन मागा. पण कायदा हातात घेऊन मारहाण करण्याचा अधिकार कुणालाही नाही. रुग्णालयात कायद्याऐवजी दादागिरी चालणार का? असाही प्रश्नडॉ. बाविस्कर यांनी या पार्श्वभूमीवर उपस्थित केला.

रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर डॉक्टर संघटना, वैद्यकीय कर्मचारी व सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT