डोंबिवली : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील प्रमुख आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. मात्र अटकेनंतर त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले. एकीकडे कल्याण-डोंबिवलीतील रूग्णालयांमध्ये डॉक्टरांचे आंदोलन सुरू असल्याने म्हात्रे यांना उपचारासाठी ठाण्यातील सिव्हील रूग्णालयाध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आरोपीला समक्ष हजर केल्याशिवाय सुनावणी घेतली जाणार नसल्याचे सांगून न्यायालयाने आरोपी म्हात्रे यांच्या वकिलांची मागणी फेटाळून लावली.
अटक केल्यापासून २४ तासांच्या आत आरोपीला न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार गुरूवारी दुपारी म्हात्रे यांना डिस्चार्ज देऊन कल्याण न्यायालयात हजर करण्याचे निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी रूग्णालयाने डिस्चार्ज रद्द केला. कल्याण न्यायालयात पोलिसांनी आणि आरोपींचे वकील ॲड. ए. आय. पत्की यांनी म्हात्रे हे किडनीच्या आजाराने उपचार घेत असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यासह पोलिस कोठडी देण्याची, तसेच इतर आरोपींसह उद्या शुक्रवारी हजर करू, अशी विनंती केली. मात्र न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी आरोपीला प्रत्यक्ष हजर केल्याशिवाय सुनावणी घेण्यास आणि कोणतेही आदेश देण्यास स्पष्ट नकार दिला. या संदर्भात ॲड. पत्की यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.
पोलिसांचीही अडचण
या प्रकरणात ठाणे सिव्हील रूग्णालयाकडून रमेश म्हात्रे यांच्या आरोग्याबाबत कोणतेही ठोस वैद्यकीय प्रमाणपत्र (मेडिकल सर्टिफिकेट) देण्यात आले नाही. जोपर्यंत मेडिकल रिपोर्ट समोर येत नाही तोपर्यंत पुढील कायदेशीर पावले उचलता येत नसल्याने पोलिसांची अडचण झाली आहे. एकंदरीत कायदा आणि न्यायालयाच्या कचाट्यातून रमेश म्हात्रे यांना वाचवण्यासाठीच वैद्यकीय कारण पुढे करून वेळकाढूपणा केला जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.