Dombivli doctor assault case | डॉक्टर हल्ला प्रकरणाला संशयास्पद कलाटणी? आधी ठरलेला डिस्चार्ज ऐनवेळी रद्द कसा?

मुख्य आरोपी रमेश म्हात्रेंना वाचवतोय कोण ? म्हात्रे यांना वाचविण्यासाठीच वैद्यकीय कारण पुढे करून वेळकाढूपणा केला जात असल्याचा संशय
Ramesh Mhatre Dombivli Doctor Assault
Ramesh Mhatre Dombivli Doctor Assaultpudhari
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाला आता संशयास्पद कलाटणी मिळात आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक केल्यानंतर अवघ्या काही वेळातच अस्वस्थ असल्याचे सांगत त्यांना ठाणे सिव्हिल रूग्णालयामध्ये दाखल केले. मात्र आधी ठरलेला डिस्चार्ज ऐनवेळी रद्द कसा झाला ? मुख्य आरोपी असलेल्या रमेश म्हात्रेंना वाचवतोय कोण ? आदी सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

     बुधवारी दुपारी १२ वाजता नगरसेवक म्हात्रे यांना डिस्चार्ज देण्याचे निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी रूग्णालय प्रशासनाने निर्णय बदलला आणि डिस्चार्ज रद्द केला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील या नेत्याला वाचविण्यासाठी पडद्यामागून कोणत्या शक्ती कार्यरत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवार रात्री झालेल्या घटनेत रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी गर्भवती महिलेच्या उपचारावरून वाद घालून रूग्णालयातील दोन डॉक्टर आणि तीन परिचारिकांना मारहाण केली.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत आहे. विष्णूनगर पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर तात्काळ म्हात्रे यांची प्रकृती खालावल्याचे सांगून त्यांना ठाणे सिव्हिल रूग्णालयामध्ये हलविण्यात आले. डिस्चार्जची वेळ जवळ आली असतानाच डॉक्टरांनी अचानक निर्णय बदलल्याने या संपूर्ण प्रकरणात रूग्णालयावरील दबावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ठाणे सिव्हिल रूग्णालयातील डॉक्टरांवर नेमका कुणाचा दबाव आहे ? याची चौकशी करण्याची मागणी आता वैद्यकीय संघटनांसह नागरिकांकडून होत आहे.

Ramesh Mhatre Dombivli Doctor Assault
Dombivli doctor assault case : डोंबिवली डॉक्टर हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती उजेडात, रमेश पवार हा मर्डर केसचा आरोपी!

म्हात्रेंना वाचविण्यासाठी वैद्यकीय अहवालाचा घोळ

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणात अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या प्रकृतीच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रक्रियेवर आता संशयाचे धुके दाटले आहे. अटकेनंतर म्हात्रे यांना ठाण्यातील सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांकडून म्हात्रे यांच्या आरोग्याबाबतचे कोणतेही ठोस मेडिकल सर्टिफिकेट देण्यास कमालीची टाळाटाळ केली जात आहे. जोपर्यंत अधिकृत मेडिकल रिपोर्ट समोर येत नाही तोपर्यंत पोलिसांना पुढील कायदेशीर पावले उचलता येत नाहीत. त्यामुळे पोलीसही संभ्रमात सापडले आहेत.

कायदा टाळण्यासाठी नाटक ?

वैद्यकीय कारणाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे. कायदा आणि न्यायालयाच्या कचाट्यातून म्हात्रे यांना वाचविण्यासाठीच वैद्यकीय कारण पुढे करून वेळकाढूपणा केला जात असल्याचा संशय बळावला आहे. अटकेनंतर लगेच अस्वस्थ होणे, डिस्चार्जची तारीख ठरूनही ती रद्द होणे आणि मेडिकल रिपोर्ट न मिळणे या सर्व बाबींमुळे या संपूर्ण प्रकाराला राजकीय रंग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news