10 Lakh Theft
डोंबिवली : ग्राहकांकडून बुडित खात्यात जमा झालेली कर्ज वसुलीची १० लाखाची रक्कम एका क्षेत्रीय वसुली व्यवस्थापकाने वरिष्ठांचा विश्वास संपादन करून स्वत:च्या बँक खात्यात वळती करून घेतली. त्यानंतर ही रक्कम आपल्या वित्तीय संस्थेत जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून त्या रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वित्तीय संस्थेच्या बुडित कर्ज वसुली अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार रामनगर पोलिसांनी क्षेत्रीय वसुली व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या एका वाणिज्य संकुलात वित्तीय संस्थेचे कार्यालय आहे. ग्राहकांनी या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाऊ रकमेचे हप्ते वेळेत फेडले नाहीत. त्यामुळे त्या रकमा ग्राहकाकडे थकित राहतात. अशा कर्जाऊ रकमा वसुली करण्याचे काम ही वित्तीय संस्था करते. या संस्थेचा वसुली अधिकारी पुण्यातील रहिवासी आहे. तर ज्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तो क्षेत्रीय अधिकारी कर्जत तालुक्याच्या वांगणी गावातील रहिवासी आहे. एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
या संदर्भात वसुली अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार आमचे कार्यालय मानपाडा रोडला असलेल्या एका वाणिज्य संकुलात आहे. ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाच्या थकित रकमा वसुली करण्याचे काम आमची वित्तीय संस्था करते. या संस्थेतील क्षेत्रीय व्यवस्थापकाने आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन केला.
ग्राहकांकडून त्यांच्या थकित कर्जाऊ रकमा वसूल करत आहोत, असे दाखवून ग्राहकांकडील कर्जाऊ रक्कम एका राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या स्वतःच्या खात्यात भरण्यास सांगितले. या अधिकाऱ्याच्या सूचनेप्रमाणे ग्राहकांनी त्यांच्या थकीत असलेल्या एकूण १० लाखांहून अधिकच्या रक्कमा क्षेत्रीय व्यवस्थापकाने स्वतःच्या व्यक्तिगत बँक खात्यात जमा केल्या.
अशाप्रकारे व्यक्तिगत खात्यात संस्थेची रक्कम जमा करून घेणे नियमबाह्य आहे हे माहिती असुनही क्षेत्रीय व्यवस्थापकाने गैरकृत्य केले. त्यानंतर ही रक्कम क्षेत्रीय व्यवस्थापकाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून वित्तीय संस्थेच्या रकमेचा अपहार करून संस्थेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.