Police  Pudhari
ठाणे

Dombivli abandoned children: ‘खाऊ आणते’ म्हणत आई गायब! भररस्त्यात सोडून गेलेल्या चिमुरड्यांच्या वडील, आजीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

सध्या मुलांचा ताबा त्यांच्याकडे देण्यासाठी ही बाब बालकल्याण समितीकडे वर्ग करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: खाऊ आणायला जाते, असे सांगून गेलेली आई आपल्या जन्म दिलेल्या तिन्ही चिमुरड्यांना भर रस्त्यात सोडून बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. विष्णूनगर पोलिसांनी केलेल्या तपासात मुलांच्या वडिलांचा आणि आजीचा शोध लागला आहे. ते खालापूरचे रहिवासी आहेत. सध्या मुलांचा ताबा त्यांच्याकडे देण्यासाठी ही बाब बालकल्याण समितीकडे वर्ग करण्यात आली आहे.

पश्चिम डोंबिवलीतील तुळशीराम बंगल्याजवळ सोमवारी, 4 मे रोजी सकाळी 9 च्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारा प्रकार उघडकीस आला. खाऊ आणायला जाते, असे सांगून गेलेली आई आपल्या तीन लहान मुलांना रस्त्यावरच रडत-घाबरलेल्या अवस्थेत सोडून बेपत्ता झाली.

रस्त्याने जाणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी जयश्री यादव यांना हे चिमुरडे दिसले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत तिन्ही निरागस मुलांना ताब्यात घेऊन थेट विष्णूनगर पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी तातडीने दखल घेत तपास सुरू केला. मुले लहान असल्याने त्यांना नाव-गाव सांगता आले नाही. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्टच्या बाल निवारा केंद्रात ठेवण्यात आले.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि स्थानिक चौकशीतून मुलांच्या कुटुंबीयांचा माग काढला. वडील आणि आजी सापडली असले तरी आईचा ठावठिकाणा अद्यापही लागलेला नाही. आईने असे टोकाचे पाऊल का उचलले ? यामागे कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचना की अन्य काही कारण आहे का ? याचा तपास सुरू आहे.

डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमिला कावळे आणि त्यांच्या पथकाने त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

मुलांचा ताबा वडील/आजीकडे

बेवारस मुलांपैकी एक मुलगा अंदाजे 2 ते 3 वर्षांचा असून तो स्वतःचे नाव स्वराज सांगत आहे. तसेच दोन जुळ्या मुली अंदाजे एक ते दीड वर्षांच्या आहेत. स्वतःची नावे काजू आणि लाडू असे सांगणाऱ्या या मुली आम्हाला आईने सोडून गेल्याचे सांगत आहे.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या मुलांना बाल निवारा केंद्र असलेल्या डोंबिवलीतील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट येथे ठेवण्यात आले होते. वडील आणि आजीने मुलांचा ताबा घेतला असून सदर वर्णनाच्या मुलांची कुठे तक्रार नोंद असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT