एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये बीएसएनएल टेलिफोनसह खासगी नेट कंपन्यांच्या जुन्या, पण वापरात नसलेल्या भूमिगत केबल उखडून त्या गोणीत भरून घेऊन जाणाऱ्या संशयिताची छबी या भागातील जागरूक रहिवासी राजेश कोलापाटे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये टिपली आहे. (Pudhari File Photo)
ठाणे

Dombivli Scrap Thieves | डोंबिवलीत भंगारचोरांचा कारनामा चव्हाट्यावर

बीएसएनएल टेलिफोनच्या भूमिगत केबलच्या चोऱ्या; जागरूक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागामध्ये बीएसएनएल टेलिफोनसह खासगी नेट कंपन्यांच्या जुन्या, पण वापरात नसलेल्या भूमिगत केबल चोरीस जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या संदर्भात भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना दक्ष नागरिकांकडून माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात बीएसएनएलकडून योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित असल्याची जागरूक रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रविवार रात्री साडेनऊ वाजण्याचा सुमारास धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एमआयडीसीच्या निवासी विभागातील आर एक्स ०१ या साईसृष्टी सोसायटी समोरील बाजूस खोदलेल्या गटारातून तीन संशयीत इसम केबल कापून त्या गोणीत भरत असल्याचे जागरूक रहिवासी राजेश कोलापाटे यांना आढळून आले. रात्रीच्या सुमारास हे इसम या भागात नक्की काय काम करत आहेत ? असा संशय बळावल्यावर राजेश यांना त्या संशयितांना हटकले असता ते पळून जाऊ लागले. त्या संशयीतांपैकी एकाचा गोणीमध्ये केबल घेऊन जात असल्याची छबी राजेश यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये टिपली. ही माहिती राजेश यांनी या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनाही दिली. त्यांनी ही माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना पाठवून सदर घटनेची चौकशी/तपासणी करण्यास सांगितले. यात तथ्य आढळ्यास योग्य ती कार्यवाही करण्यास बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे राजू नलावडे म्हणाले.

  एमआयडीसीसह निवासी विभागामध्ये काँक्रीटीकरण केलेले रस्ते, गटारे, नाले आणि सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी वाहिन्यांची कामे करत असताना काही केबल नादुरूस्त झाल्या होत्या. त्यामुळे जुन्या नादुरूस्त केबल तशाच राहिल्याने त्या चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या केबलला भंगारात चांगला भाव मिळत असल्याने त्या चोरीस जात आहेत. बीएसएनएलकडून कमीतकमी या जमिनीतील जुन्या केबल काढून टाकल्या गेल्या पाहिजे होत्या. त्या केबलचा उपयोग जॉईंट किंवा अन्य कामासाठी करता येईल.

 भंगारात सदर केबल विकली तरी त्यातून बीएसएनएलला काही आर्थिक फायदा होऊ शकतो. अशा नजरेआड झालेल्या केबल चोरणारे चोरटे शेवटी भंगारात हा माल विकत असतात. त्यामुळे केबल चोरांची बीएसएनएलने पोलिसांकडे तक्रार करायला हवी. केबल चोरट्यांना पकडून त्यात त्यांना साह्य करणारे कुणी इतर व्यक्ती वा भंगारवाले असतील तर तेही उघडकीस येईल, अशी शक्यता जागरूक रहिवासी राजू नलावडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT