डोंबिवली: प्रेमात नकार मिळाला म्हणून प्रियकराने थेट प्रेयसीचे घरच पेटवून दिल्याची अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. ब्रेकअपचा राग मनात धरून संतप्त झालेल्या प्रियकराने मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या या भयंकर कृत्यामुळे अवघा परिसर हादरून गेला आहे.
तरूणी आणि तिचे आई-वडील आगीच्या तावडीत सापडता सापडता थोडक्यात बचावले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी दीपेश रस्तोगी याला अटक करून त्याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात केला. अधिक चौकशीसाठी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एका उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या तरूणीचे दीपेश रस्तोगी याच्यासोबत गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झालेली ही ओळख पुढे घट्ट मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सतत वाद, मतभेद आणि गैरसमज वाढू लागले होते.
दीपेशच्या वागण्यातील बदल, सततचा संशय आणि दडपण याला कंटाळून अखेर तरूणीने हा संबंध कायम ठेवायचा नाही, असा ठाम आणि स्पष्ट निर्णय घेतला होता. तिने याबाबत दीपेशला स्पष्टपणे सांगितले होते, तू मला विसरून जा, आता आपल्यात काहीही राहिलेले नाही, असे तिने ठणकावून सांगितले होते.
मात्र, प्रेयसीने संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्याने दीपेशचा अहंकार दुखावला गेला. माझी नाही तर कुणाचीच नाही, या विकृत मानसिकतेतून तो पेटून उठला. तू मला सोडून जाऊच कशी शकतेस, याचा बदला मी घेईन, अशी धमकीही त्याने दिल्याचे बोलले जात आहे. याच रागातून आणि सूडाच्या भावनेतून त्याने प्रेयसीच्या घराला आग लावली.
अचानक घराला आग लागल्याने घरात एकच धावपळ उडाली. आगीच्या ज्वाळा, धूर आणि जळण्याचा वास यामुळे कुटुंबीयांना काही क्षण काय करावे हेच सुचेनासे झाले. तरूणीसह तिचे आई-वडील आगीच्या तावडीत सापडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, प्रसंगावधान राखत तिघांनीही कसेबसे घराबाहेर धाव घेत स्वतःचा जीव वाचवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, नाहीतर अवघे कुटुंब आगीत होरपळले असते.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे मानपाडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घराला आग नेमकी कशी लागली, याचा शोध घेताना पोलिसांचा संशय दीपेशवर बळावला.
मोबाईल लोकेशन, घटनास्थळावरील पुरावे आणि तरूणीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी दीपेश रस्तोगी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहेत.