आयुष कदम  (Pudhari File Photo)
ठाणे

Dombivli Boy Death | जेवणावळीनंतर हात धुवायला गेला...अन् बेपत्ता झाला

डोंबिवलीत १३ वर्षीय निष्पाप मुलाचा नाल्यात पडून मृत्यू; जबाबदार कोण ? केडीएमसी प्रशासन की आयोजक? संतप्त रहिवाशांचा प्रश्न निरूत्तरित

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Tragic Incident

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील ह प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत असलेल्या देवीचापाडा परिसरातील जगदांबा माता मंदिराच्या जवळून भरत भोईर नावाचा नाला वाहतो. या नाल्याला जोडलेल्या चेंबरवर झाकण नव्हते. मुसळधार पावसामुळे नाला दुथडी भरून वाहत होता. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी हृदयद्रावक घटना घडली. तेथील जगदंबा मातेच्या मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त आयोजित केलेल्या भंडाऱ्यात जेवण केल्यानंतर १३ वर्षीय मुलगा हात धुवायला गेला आणि क्षणार्धात बेपत्ता झाला. अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक रहिवाशांनी तात्काळ शोध घेऊन बेपत्ता मुलाचा मृतदेह बाहेर काढला. मुलाचा हकनाक बळी जाण्याला नक्की जबाबदार कोण ? केडीएमसी प्रशासन की आयोजक ? या प्रश्नांचे उत्तर अद्याप कुणीही देऊ शकले नाही.

आयुष एकनाथ कदम (१३) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. हा मुलगा देवीचा पाड्यातील जगदांबा माता परिसरात असलेल्या शांताराम निवासमध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. तो महात्मा फुले रोड वरील स्वामी विवेकानंद शाळेच्या अरूणोदय शाखेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता. या घटनेनंतर आयुष राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, रविवारी दिवसभर सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत होता. रात्री पावसाने काहीशी उसंत घेतली होती. सरोवर नगरातील भरत भोईर नावाच्या नाल्यापासून जवळच जगदंबा मातेचे मंदिर आहे. दरवर्षी या मंदिराचे मंडळ नवरात्रौत्सवा निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करत असते. परिसरातील शेकडो भाविक आणि रहिवासी भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. मंडळाचे सदस्य एकनाथ कदम हे देखील नवरात्रौत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेत असतात. तथापी कदम कुटुंबियांवर दुःखाचा पहाड कोसळला. एकनाथ यांचा मोठा मुलगा आयुष हा जगदंबा मातेच्या मंदिरात आयोजित केलेल्या भंडाऱ्यात जेवल्यानंतर हात धुण्यासाठी तेथील उघड्या चेंबर जवळ गेला.

हात धूत असताना इतक्यात तोल जाऊन आयुष चेंबरमध्ये पडला. इतर मुलांनी आरडाओरडा केला. आयुष तेथून बेपत्ता झाल्याचे कळताच भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला जमलेल्यांनी मोबाईल टॉर्चच्या उजेडात आयुषला शोधण्याचा प्रयत्न केला. तथापी तो कुठेही आढळून आला नाही. एकाने नाल्यात उडी मारून आयुषला वाचविण्याचा प्रयत्न केला. नाल्यातील वेगवान प्रवाहामुळे तो हाती लागला नाही. विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामचंद्र चोपडे, उबाठाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे, मनसेच्या स्थानिक माजी नगरसेविका सरोज भोईर, उबाठाचे विभागप्रमुख राजेंद्र सावंत, आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

साधनसामुग्रीच्या अभावामुळे शोधकार्यात अडथळे

तात्काळ ही माहिती अग्निशमन दलाच्या गरिबाचावाडा विभागाला देण्यात आली. जवानांनी तातडीने घटनास्थळी येऊन आयुषला शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवानांकडे टॉर्च व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची साधनसामुग्री देखिल नव्हती. त्यातच रात्रीचा अंधार असल्यामुळे नाल्यात उतरलेल्यांच्या शोधकामात अडथळे येत होते. अखेर अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बेपत्ता आयुषला शोधण्यात यश आले. मात्र तो निस्तेज झाला होता. तात्काळ त्याला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले. अखेर तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर आयुषचा मृतदेह त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. साधनसामुग्रीच्या अभावामुळे शोधकार्यात अडथळे आल्याने उशिरा हाती लागलेला आयुष आयुष्याला कायमचा मुकल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील रहिवाशांकडून उमटत आहेत.

मृत्यूकांडाशी संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी

दरम्यान नाल्याला जोडलेल्या गटाराच्या चेंबरचे झाकण सुस्थितीत नव्हते. ते पाहण्याची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आहे. केडीएमसीचे याकडे दुर्लक्ष झाले ? की जेवणावळीनंतर जमा होणारे निर्माल्य, खरकटे, पत्रावळ्या, आदी कचरा टाकण्यासाठी नाल्याला जोडलेल्या गटाराच्या चेंबरचे झाकण काढणारे आयोजक जबाबदार आहेत ? या साऱ्या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी एकीकडे पोलिसांनी तांत्रिक चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे निष्पाप आयुषचा हकनाक बळी जाण्यास अप्रत्यक्ष जबाबदार असलेल्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुषच्या कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT