molestation file photo
ठाणे

Crime News: डोंबिवलीत अनाथ तरुणीवर अत्याचार; मदतीसाठी धावून आलेल्या मित्राचेच दुष्कृत्य

मानपाडा पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: डोंबिवलीत अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका अनाथ तरुणीला तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्यावर मदतीसाठी धावून आलेल्या मित्रानेच तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.

या तरुणाला अटक करण्यात आली असून कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

समाज माध्यमांवर झालेल्या ओळखीचा फायदा घेत मदतीच्या बहाण्याने या तरुणाने रविवारी रात्री तरुणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि मोबाईल घेऊन पसार झाला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

या घटनेतील पीडित तरुणी एका खासगी ठिकाणी नोकरी करते. अनाथ असलेल्या या तरुणीला आई-वडील नाहीत. काही दिवसांपूर्वी या तरुणीवर एका खोट्या प्रकरणावरून आरोप करत तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीत मैत्रिणीच्या वडिलांचाही समावेश होता. घाबरलेल्या तरुणीला या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायची होती, पण सोबत कुणीही नव्हते. अशा वेळी तिने समाज माध्यमांच्या ॲपवरून ओळख झालेल्या मित्राला मदतीसाठी बोलावून घेतले.

या तरुणाने तिला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याने तिला मानपाडा पोलीस ठाण्यात न नेता रविवारी रात्री एका निर्जन स्थळी नेले. तिथे त्याने पीडित तरुणीवर अत्याचार केला.

एवढ्यावरच न थांबता या आरोपीने तिच्या गुगल-पेवरून स्वतःच्या अकाऊंटला पैसे ट्रान्स्फर केले. शिवाय तिच्या मोबाईलमधील सिम कार्ड काढून तर घेतलेच शिवाय तिचा मोबाईल घेऊन तिथून पळ काढला.

आपल्याबाबत घडलेल्या या प्रकारामुळे तिने हिंमत करून सकाळी मानपाडा पोलीस पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तशी फिर्याद दाखल केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या काही तासांतच शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT