Dombivli Garden Maintenance
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे धर्मवीर आनंद दिघे उद्यान ठेकेदाराचा ठेका संपल्याने तेथे सुरक्षा रक्षक नसल्याच्या कारणावरून गेल्या महिनाभरापासून कुलूपबंद करण्यात आले आहे. या उद्यानाच्या मुख्य दरवाजाला टाळे-कुलूप लावल्याने एप्रिल-मे महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत खेळण्यासाठी मिळत नसल्याने परिसरातील मुलांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
उद्यान बंद असल्याने ज्येष्ठांसह इतर नागरिकांना जॉगिंग ट्रॅक आणि ओपन जिमचा वापर करता येत नाही. उद्यानात असलेल्या बाकड्यांवर बसून ज्येष्ठ नागरिक विश्रांती घेत गप्पा-गोष्टी करत असतात. परंतु कुलूपबंद उद्यानात जाता येत नसल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे. या उद्यानात विविध प्रकाराची लहान-मोठी झाडे असून त्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची आवश्यकता असते. ठेकेदारामार्फत ठेवलेला सुरक्षारक्षक उद्यानातील झाडांना पाणी देत असे. मात्र एक महिना उलटूनही पाणी मिळत नसल्याने या उद्यानातील झाडे मरणासन्न अवस्थेत झाली आहेत. अनेक झाडे तर सुकली आहेत. याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
उद्यानाला लागलेले टाळे उघडावे आणि सुरक्षारक्षक ठेकेदाराची नेमणूक त्वरित करावी. अथवा तोपर्यंत उद्यान विभागातील एखाद्या कर्मचाऱ्याला तेथे देखभाल करण्याच्या, तसेच उद्यान उघडण्याच्या सूचना देण्यात याव्यात, यासाठी माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे आणि शिवसेना शाखाप्रमुख सागर पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही.
सद्या कडक ऊन असल्याने उद्यानातील झाडांमुळे परिसरात काहीसा थंडावा येत असतो. तसेच प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण होत असते. उद्यानामुळे येथील परिसराची शोभा आणि सुंदरता वाढली होती. यापूर्वीही या उद्यानाची नियमित देखभाल-दुरूस्ती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून होताना दिसत नव्हती.
झाडे लावा झाडे जगवा ! हे सरकारी धोरण असताना, शिवाय डोंबिवलीत उद्यानांची कमतरता असतानाही अस्तित्वात असलेल्या उद्यानांकडे सुस्त प्रशासन लक्ष देत नाही. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने असलेल्या या उद्यानाचा सर्वनाश करण्याचा प्रशासनाने आणि त्यांच्या नावाचा केवळ वापर करणार्या मतलबी नेत्यांनी ठरविले आहे का ? असा सवाल डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी उपस्थित केला आहे.