डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील केडीएमसीच्या धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला वर्षभरात वारंवार टाळे लावून बंद करण्यात येत असल्याने या उद्यानाशी संबंधित अबालवृद्ध आता मात्र वैतागले आहेत.
नेत्या-पुढाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी या उद्यानाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील रहिवासी करत आहे. जर हे उद्यान यापुढे जनतेसाठी नियमित सकाळ आणि सायंकाळी उघडले गेले नाही तर २६ ऑगस्ट रोजी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पंचविसाव्या पुण्यतिथीला या उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर स्थानिक सामाजिक संघटनांतर्फे जनआंदोलन करण्यात येणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे उद्यान हे २००२ साली शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने उभारले होते. त्यानंतर खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि तत्कालीन आ. राजू पाटील यांनी या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी अंदाजे ५० लाख रुपये निधी दिला होता.
यात जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी विविध खेळणी तसेच अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली होती. तसेच या उद्यानासाठी केडीएमसीमार्फत एक कंत्राटी सुरक्षा रक्षकही नेमण्यात आला होता. परंतु गेल्या वर्षभरापासून कंत्राटी सुरक्षा रक्षकाचा ठेका संपल्याने उद्यानावर सुरक्षा रक्षक नसल्याने हे उद्यान सकाळ आणि संध्याकाळ नियमित उघडले जात नव्हते. यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
मध्यंतरी काही दिवस स्थानिक रहिवाशांनी स्वतःच्या जबाबदारीवर हे उद्यान उघडण्याची तयारी दाखवली होती. मात्र या काळात उद्यानाची साफसफाई आणि झाडांना पाणी देणे यासारखी देखभाल होत नव्हती. दरम्यान पुन्हा उद्यान बंद करण्यात आले. त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या उद्यानात येता येत नव्हते.
बच्चे कंपनीसह वृद्ध मंडळींच्या आशा मावळल्या
काही दिवसांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वतीने समाजमाध्यमांवर पत्र आणि उद्यानाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक उभा असल्याचा फोटो टाकून हे उद्यान आता नियमित उघडले जाईल आणि सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे हे उद्यान आता कायमस्वरूपी नियमित सकाळ-संध्याकाळ उघडले जाईल, अशी आशा निर्माण झाली होती. तथापि गेल्या वर्षभरात सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीवरून हे उद्यान वारंवार बंद राहत असल्याने बच्चे कंपनीसह वृद्ध मंडळींच्या आशा मावळल्या आहेत. स्थानिक रहिवाशांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्थानिक शाखेशी संपर्क साधला. हे उद्यान दररोज नियमित सकाळी आणि संध्याकाळी वेळेवर उघडले पाहिजे. उद्यान किती वाजता उघडणार आणि बंद होणार याचे वेळापत्रक आणि इतर सूचनांचा फलक प्रवेशद्वारावर लावण्यात यावा. तसेच उद्यानात वाढलेले गवत आणि झाडी/झुडपे कापून साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
२६ ऑगस्टला जनआंदोलन
उबाठाचे उपविभागप्रमुख मंदार स्वर्गे, शाखाप्रमुख सागर पाटील, महिला आघाडी विभाग संघटक रजनी कुचे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्यासह असंख्य शिवसैनिक येत्या २६ ऑगस्ट रोजी धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ व्या पुण्यतिथी दिनी धर्मवीर आनंद दिघे उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहून आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात इतर स्थानिक सामाजिक संस्था/संघटनांसह परिसरातील अबालवृद्धही सामील होणार असल्याचे या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.