ठाणे

Dombivali Barvi Dam : बारवी धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर, ९९.८८ टक्के भरले

एमआयडीसी प्रशासन सतर्क

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्हावासीयांची तहान भागवणारे बारवी धरण मुसळधार पावसामुळे आज पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. रविवारी, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार बारवी धरण ९९.८८ टक्के भरले असून, धरणाची सध्याची पाणीपातळी आणि ओव्हरफ्लो पातळी यांत केवळ ०.०१ मीटरचे अंतर उरले आहे.

एमआयडीसी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारवी धरणाची सध्याची पाणीपातळी ७२.५९ मीटर झाली आहे. धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठा ३३८.४४ दशलक्ष घनमीटरवर पोहोचला आहे. बारवी धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही तासांत धरण ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) बारवी धरण हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रासह ठाणे जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. परिणामी, धरणातील पाणीपातळी वेगाने वाढत आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून धरणाच्या पाणीपातळीवर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. धरणाच्या सखल भागातील तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने विसर्ग करण्याची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

धरण ओव्हरफ्लो झाल्यास संपूर्ण जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, त्याच वेळी सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारवी धरण लवकर भरल्याने पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या २४ तासांत बारवी धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो होण्याची आणि नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT