Doctor Attack Case Pudhari
ठाणे

Doctor Assault Case: डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक होताच शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पडले आजारी

अटक आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी दुपारी विष्णूनगर पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना अटक केली. कल्याण न्यायालयाने तिघा अटक आरोपींना १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे खासगी अंगरक्षक असलेले रमेश लक्ष्मण पवार (५०), प्रकाश उर्फ प्रकाश उध्दव निकम (३५), अक्षय शरद कारंडे (३०) या तिघांना पोलिसांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही चित्रणाचे आधारे मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील अटक झालेल्या एकूण आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

रूग्णालयात येऊन रमेश म्हात्रे यांनी प्रथम डाॅक्टरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि डाॅ. वैभव साळुंखे, डाॅ. सृष्टी बाविस्कर यांना मारहाण केली. दोन परिचारिकांनाही मारहाण करत अरेरावी केली. अन्य आरोपींना अटक झाली तरी मुख्य आरोपी म्हात्रे मात्र मोकाट होता. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर शासनाने स्वत: कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले.

आमदार रोहित पवार यांनीही आंदोलनाचा इशारा दिला. आमदार आदित्य ठाकरे यांनीही बुधवारी रूग्णालयाला भेट देत डॉक्टरांना आधार दिला आणि रमेश म्हात्रे याला केवळ अटक करून चालणार नाही तर त्याची धिंड काढली पाहिजे, त्याला नगरसेवक पदावरून हटवले पाहिजे, अशीही भूमिका घेतली.

शिंदे शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनीही डाॅक्टरांच्या पाठीशी शिवसेना ठाम असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी रमेश म्हात्रे यास पोलिसांनी अटक केली. मात्र, त्यानंतर रमेश म्हात्रेची तब्येत बिघडली. त्याला ठाणे सिव्‍हिल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयाचा त्रास होत असल्याचा दावा त्याने केला.

राज्यभर 'काळी फीत' आंदोलनाचा इशारा

डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला परिचारिका व डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र निषेध केला असून, संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत १० जुलैपासून राज्यभर काळी फीत लावून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT