Diwali 2026 pudhari photo
ठाणे

Diwali 2026 Dates : खाडे दिवस असल्याने यंदा दिवाळीत दोन दिवस सण नाही - दा. कृ. सोमण

शनिवार (दि. ७) आणि सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी ‘खाडे दिवस’ असल्याने त्या दिवशी कोणतीही दिवाळीची तिथी नसल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाचा पहिला दिवस रमा एकादशी, वसुबारस, गोवर्धन ५ नोव्हेंबर हा आहे. यंदा ५ नोव्हेंबरपासून सुरू होणारी दिवाळी ११ नोव्हेंबरपर्यंत दिनदर्शिकेत दिसत असली तरी शनिवार ७ आणि सोमवार ९ नोव्हेंबर रोजी खाडे दिवस असल्याने त्या दिवशी कोणतीही दिवाळीची तिथी नसल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी आज (५ नोव्हेंबर) रमा एकादशी, वसुबारस, गोवर्धन द्वादशी आहे, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन, यमदीपदान आहे मात्र शनिवार ७ नोव्हेंबर खाडे दिवस आहे. रविवार ८ नोव्हेंबर : या दिवशी नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मी कुबेर पूजन, अलक्ष्मी निस्सारण, महावीर निर्वाण आहे. या दिवशी पहाटे ५:३८ वाजता चंद्रोदय आहे. तेथपासून सूर्योदयापर्यंत सकाळी ६-४३ पर्यंत अभ्यंगस्नान करावे. सायं. ६ ते रात्री ८:३३ पर्यंत प्रदोषकाली लक्ष्मी- कुबेर पूजन करावे, असे आवाहन सोमण यांनी केले.

सोमवार ९ नोव्हेंबर रोजी सूर्योदयी कार्तिक शुक्ल प्रतिपदा नाही. म्हणून त्या दिवशी काही सण नाही. मंगळवार १० नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, वही पूजन, विक्रम संवत् २०८३ कालयुक्त संवत्सर प्रारंभ, महावीर जैन संवत् २५५३ प्रारंभ होणार असून अन्नकूट, गोवर्धन पूजन आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. या दिवशी हिशेबाच्या नवीन वह्यांचे पूजन- लेखन करावे.

बुधवार ११ नोव्हेंबर : या दिवशी भाऊबीज आहे. रविवार, ८ नोव्हेंबर रोजी चंद्रोदय काली आश्विन कृष्ण चतुर्दशी आहे. म्हणून त्या दिवशी नरकचतुर्दशी आहे. त्याच दिवशी सकाळी ११:२८ वाजता चतुर्दशी संपून अमावास्या सुरू होते, त्याच दिवशी प्रदोषकाली अमावास्या आहे म्हणून त्याच दिवशी लक्ष्मीपूजन करायचे आहे, अशी माहिती सोमण यांनी दिली.

दिवाळीचे दिवस असे ठरतात...

प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी असते, तेव्हा वसुबारस असते. प्रदोषकाळी आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी, चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी असते. चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशीला लक्ष्मीपूजन केले जाते. सूर्योदयी कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा तिथी असते.

अपराण्हकाली कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. त्यामुळे यावर्षी शनिवार ७ नोव्हेंबर आणि सोमवार ९ नोव्हेंबर या दिवशी दिवाळीचा कोणताही सण नाही. याला ' खाडे दिवस ' म्हणतात, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT