डोंबिवली (ठाणे) : कल्याण-डोंबिवलीत प्रकाशोत्सव अर्थात दिवाळीची तयारी सुरू झाली आहे, ज्यामध्ये महापालिका प्रशासन स्वच्छता मोहिम राबवत आहे. तर गृहिणी दिवाळी फराळाचे साहित्य तयार करत आहेत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोने-चांदी सारख्या वस्तूंची खरेदी करण्याचा बेत आखला जात आहे.
हे सर्व असताना दिवाळी पहाट कार्यक्रमाची आयोजकांनी तयारी केली आहे. कल्याणात मॅक्सी ग्राऊंड, तर डोंबिवलीत फडके रोडवर दिवाळी पहाट कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने दिवाळीनिमित्त स्वच्छ दिपावली शुभ दिपावली या उपक्रमांतर्गत सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे, विशेषतः कल्याण स्टेशन परिसरात स्वच्छता केली जात आहे. विशेष म्हणजे यावेळी केडीएमसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून उपस्थितांना स्वच्छता व फटाकेमुक्त दिवाळी विषयी शपथ देऊन आपला परिसर सदैव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी अग्निशमन दल सज्ज झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन केंद्रांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगींच्या घटना घडू नयेत, यासाठी काळजी घेतली जात आहे.
दिवाळीच्या फराळासाठी लागणारे तयार पीठ विकणारे व्यावसायिक कल्याण आणि डोंबिवलीत सक्रिय झाले आहेत. दिवाळीसाठी सोने, चांदी आणि दागिने खरेदी करण्यासाठी नागरिक बँकांमध्ये निधी उपलब्ध ठेवत आहेत. मात्र, काही ठिकाणी धनादेश (चेक) वटण्यास विलंब होत असल्याने नाराजी आहे.
दिवाळी आणि फडके रोड यांचे एक अतूट नाते आहे. वर्षानुवर्ष दिवाळी पहाटच्या निमित्ताने या रोडवर तरूण-तरूणींसह अबाल वृध्द महिला यांची शुभेच्छा देण्यासाठी रेलचेल पहायला मिळते. यानिमित्ताने तरूणाईचा केंद्रबिंदू असलेला फडके रोड पुन्हा बहरणार आहे. येत्या २० ऑक्टोबरला दिवाळी पहाटनिमित्त फडके रोडवर विविध कार्यक्रमाचे आयोजन ही केले आहे.
डोंबिवलीच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातील तरूणाई फडके रोडवर दिवाळी पहाटेचे औचित्य साधून उतरत असते. सुरूवातीला ग्रामदैवत असलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले जाते. त्यानंतर तरूणाईसह अबाल वृध्द फडके रोडवर येतात आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देतात. दिवाळीच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
फडके रोडवर युवा शक्ती-भक्ती दिन
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा शक्ती-भक्ती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवारी २० ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता श्री गणेश मंदिर पथ क्रॉस फडके रोडला अप्पा दातार चौकात संपन्न होणार आहे. यावेळी अलंकार नृत्यालय, पल्लवी नृत्यनिकेतन संस्था आणि नृत्य साधना निकेतन प्रस्तुत नृत्यगंध हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन सुनिला पोतदार, सायली शिंदे करणार आहेत. कार्यक्रमात शंखवादन डॉ. अक्षय कुलकर्णी यांनी केले.
कल्याणच्या मॅक्सी ग्राऊंडवर सुरेल पहाट
शिवसेनेच्या कल्याण शहर शाखेतर्फे कल्याणकरांसाठी सुरेल दिवाळी पहाट कार्यक्रमाचचे आयोजन केले आहे. पश्चिमेकडील कर्णिक रोडला असलेल्या मॅक्सी ग्राऊंड अर्थात यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर प्रसिद्ध कलाकार आणि गायकांच्या उपस्थितीत रसिकांना अविस्मरणीय स्वरानुभूतीचा अनुभव देतील. संसदीय शिवसेना गटनेते तथा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. बुधवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजल्यापासून चालणाऱ्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी केले आहे.