येथील शाळेत बाथरुममध्ये वापरण्यासाठी खड्डयातील पाणी उपसले जात होते.  
ठाणे

Diva News | दिव्यातील ड्यू ड्रॉप शाळेत किळसवाणा प्रकार; लहान मुलांना बाथरुममध्ये वापरण्यास खड्ड्याचे घाण पाणी

मुलांच्या आरोग्याशी होतोय रोज खेळ : मनसे पदाधिकाऱ्यांनी आणला प्रकार उघडकीस, संचालकांचे मात्र पाण्याचा वापर मैदानात मारण्यासाठी केला जात असल्याचे म्हणने

पुढारी वृत्तसेवा

आरती परब

दिवा : दिवा शहराच्या पूर्वेकडील विकास म्हात्रे गेट परिसरातील मातोश्री नगर येथे असलेल्या ड्यू ड्रॉप शाळेत मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील लहान मुलांना बाथरुममध्ये थेट खड्ड्यातील गटारमिश्रित घाण पाणी वापरायला लावल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, हा प्रकार दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान उघड केला.

ही तक्रार प्रथम दिवा मनसे महिला बेडेकर शाखाध्यक्ष अंकिता कदम यांच्याकडे काही पालकांनी केली. तक्रारीतील आरोपांची खात्री करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शाळेला दुपारच्या वेळी भेट दिली असता, बाथरुममध्ये स्वच्छ पाण्याऐवजी घाण पाणी वापरले जात असल्याचे उघड झाले.

यामुळे मुलांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप करत शाळेचे संचालक उत्तम सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. या प्रकाराचे व्हिडिओ पुरावे मनसे पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांना पाठवले असता, त्यांनी तात्काळ चौकशीसाठी शिक्षण विभागाची विशेष टीम पाठवत असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित शाळेची मान्यता रद्द करून मुलांना सुरक्षित पर्याय म्हणून इतर शाळेत हलवावे, अशी ठाम मागणी दिवा मनसेकडून करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम, उपशाध्यक्ष जितेंद्र गुरव हे पदाधिकारी उपस्थित होते.

-शाळेच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या मोठ्या मैदानावर खेळण्याआधी पाणी मारण्यासाठी पावसाआधी आम्ही शाळेच्या मागे एक खड्डा मारला होता. त्यात एक पाईप टाकून तो मोटरला जोडून आम्ही शाळेसमोरील मैदानावर पाणी मारतो. तर शाळेचे स्पोर्ट्स डे असल्यामुळे आम्हाला सकाळ संध्याकाळ मैदानावर पाणी मारतो. तसेच आमच्या शाळेतील मुलांना पिण्यासाठी आणि बाथरुमसाठी वेगळी पाण्याची लिगल लाईन आहे. आम्ही शाळा चालवतो तर आम्हाला मुलांची काळजी आहे. मनसेचे पदाधिकारी शाळा तपासायला आले असताना पाण्याच्या लिगल लाईनला पाणी सुरु होते. तर ते खड्ड्यातील पाण्याची मोटर बंद होती.
उत्तम सावंत, ड्यू ड्रॉप शाळा संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT