

ठाणे : सोमवारी दिव्यात बंदोबस्तासह अनधिकृत बांधकामांवर कारवाइसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. एका महिलेने तर पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर रॉकेल टाकले. त्यामुळे कारवाईच्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने दिव्यातील शीळ परिसरात यापूर्वीच पालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. मात्र दिवाळीचा सण आल्याने दिव्यातील या कारवाईला ब्रेक लागला होता. मात्र दिवाळीनंतर उर्वरित इमारतींवर पुन्हा एकदा पालिकेच्या अतिक्रण पथकाने कारवाईचा बडगा उगारत सोमवारी पहिल्याच दिवशी उर्वरित 7 इमारतींवर कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पालिकेचे पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तात गेले.
पथकाने इमारत रिकाम्या करण्यास सुरुवात केल्यावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहिवाशी जमा झाले. यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्यामुळे पालिकेच्या कारवाईला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. विरोध करत असलेल्या एका महिलेने तर पोलिसांवर आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर चक्क रॉकेल टाकले. यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढचा अनर्थ टळला.
दोन इमारती रिकाम्या करण्यात पोलिसांना यश
एकूण अनधिकृत इमारतींपैकी 7 इमारतींवर कारवाई करण्यासाठी सोमवारी पालिकेचे पथक दिव्यात गेले होते. मात्र केवळ दोन इमारती रिकाम्या करण्यात पालिकेच्या अतिक्रमण पथकाला यश आले. तर सोमवारी एकही इमारतीवर पालिकेला हातोडा चालवता आलेला नाही.
काय आहे प्रकरण ?
शीळ परिसरातील 21 अनधिकृत इमारतींवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने कारवाई केली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. शीळ भागात झालेल्या या अनधिकृत इमारतींच्या संदर्भात तीन वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या. त्यानंतर उर्वरित इमारतींवर पालिकेने आता कारवाईला सुरुवात केली आहे.