माऊली pudhari photo
ठाणे

माऊली

॥ दुर्गुणांचं विसर्जन, तिथेच सद्गुणांची सुरुवात ॥

पुढारी वृत्तसेवा

कृष्णा जाधव - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई

धर्माच्या नावाखाली अधर्म घडवून आणणारा “दांभिक.” धर्म नव्हे दांभिक अफूची गोळी असतो. सर्वसामान्य जनतेला धर्माचा बुरखा पांघरूण फसवणारा लांडगा म्हणजे “दांभिक” दांभिक मारक, धर्म हा तारक. दांभिक हा शत्रू तर धर्म हा सखा, धर्माचा गळा घोटणं शक्य नसतं, म्हणूनच दांभिक सर्वसामान्यांचे गळे धर्माच्या नावाखाली कापून शतकानुशतके चाललेला आहे. माऊली अशा दांभिकांचा चेहरा तुमच्या आमच्यासमोर आणून खऱ्या “धर्माचं” स्वरूप दाखवतात. खरा धर्म दया, क्षमा, शांती आणि सौजन्यांचा वृक्ष असतो जो मानव्याला “छाया” देतो. याविषयीचं चिंतन आपण गतलेखात केलं. आजच्या लेखात पुढील आसुरी संपदेचा वेध -

॥ श्री ॥

बुद्धीवादी आणि पुरोगामी जे स्वतःला समजतात त्यांनी ज्ञानेश्वरी शिरावर घेऊ न नाचले पाहिजे. ज्ञानाचे झणझणीत अंजन म्हणजे “ज्ञानेश्वरी” बुद्धीचं वैभव म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृताची वेल म्हणजे ज्ञानेश्वरी, शांतीच आगर म्हणजे ज्ञानेश्वरी, वैभवाचं भांडार, समृद्धीचं वैभव म्हणजे ज्ञानेश्वरी, कर्माची ओंजळ म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी चिंतनाशिवाय जीवन अक्षरशः व्यर्थ आहे.

असो गतलेखात दंभ आणि दांभिकाच्या चिंतनानंतर माऊली दुसरा आसुरी गुण दर्प कथन करतात -

1) दर्प - “स्त्री, धन, स्तुती आणि अतिसन्मान यांच्या योगाने जो माजतो, त्या दुर्गुणास “दर्प” म्हणतात.

तैसा माजे स्त्रीयां धने | विद्या स्तुती बहुते माने |

एके दिवसीचेंनी परान्ने | अल्पकु जैसा ॥

भिकाऱ्यास एखादे दिवसीचं, एखाद्या घरातून मिष्टान्न भोजन मिळालं तर तो जसा बहकतो अगदी त्याप्रमाणे मानवी जीवनातील अत्यल्प काळाच्या आयुष्यातील मिळालेले स्त्री, धन, संपत्तीचं सुख जो मातला जातो तो दर्प.

धनामुळे लोक करत असलेली स्तुती आणि सन्मान या गोष्टी प्राप्त झाल्याने जो मनुष्य उन्मत्त होतो, त्याला या सुखाच्या प्राप्तीनं आकाश ठेंगण वाटायला लागतं. या “उन्मत्त”पणालाच “दर्प” हे नाव आहे.

हा दर्प भल्याभल्याना वेड लावतो. हाच दर्प मानवी जीवनातील तथ्यांपासून मानवास दूर घेऊन जातो. संपत्ती-धनाचा गर्व आणि दुराभिमान हा चांगल्या माणसाला धुळीस मिसळवतो. संपत्ती प्राप्त झाल्यानंतर “संयम” असेल तरच ती शोभून दिसते आणि लक्ष्मी चिरंतन वास करते. परंतु दर्प हा असा असूर दुर्गुण आहे की ज्यामुळे संपत्ती प्राप्त होताच अनेक दुर्गुणास तो पाचारण करतो. ब्रह्मांडामध्ये पृथ्वी हा धुळीचा “कण” एवढेच तिचे ते काय ते अस्तित्व असेल , तर त्यावर राहणाऱ्या माणसांच, जीवांच अस्तित्व किती असेल? तरीपण जगाला विकत घ्यायच्या आणि विश्वाला जिंकायच्या वल्गना करणारे आपण पहातच आलो आहोत की...!!!

दर्प धारण करणाऱ्या व्यक्तीचं वर्णन माऊली अनेक दाखले देऊन करतात. ज्याप्रमाणे ओझे वाहणारा घोडा ऐरावताशी स्वतःशी तुलना करतो. काटेरी झुडुपाच्या शेंड्यावर बसलेल्या सरड्यास स्वर्गापेक्षा उंच ठिकाणी बसल्याचा भास होतो, गवताला लागलेली आग त्यामधील अग्नी आकाशाकडे झेपावत त्याला जाळण्याची वल्गना करतो तशीच अवस्था “दर्प” धारण करणाऱ्या व्यक्तीची असते. थोडक्यात दर्पामुळे मानव उन्मत्त तर होतोच शिवाय तो “आंधळाही” आणि “अज्ञानीही” होत असतो.

2) अभिमान :- ज्याला ईश्वराचे अस्तित्वच मान्य नाही. वेदांनी ईश्वराची स्तुती केलेली ज्याला आवडत नाही किंबहुना वेदही आवडत नाहीत. ईश्वराचे नाव ऐकताक्षणी जो क्रोधायमान होतो. ईश्वर अस्तित्व संपवण्याच्या जो वल्गना करतो. आपला मोठेपणा मिरवण्यात सर्व शक्ती खर्च करतो. पतंगाला दिव्याचा, काजव्याला सूर्याचा, टिटवीला समुद्राचा तिटकारा असतो तसाच “ईश्वराविषयी” तिटकारा अभिमानी दुर्गुणधारीस असतो. मीपणा ज्याच्या नसांनसात भिनलेला असतो तो असा की त्याला “ईश्वर अस्तित्वच” मान्य नसते. याप्रमाणे तो मानमान्यतेचा अतिशय अभिमानी आणि उन्मत्त खोटेपणाने भरलेला असतो. माऊली या दुर्गुणास “रवरव नरकाची” उपमा देतात.

ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू | तो अभिमानी परमलंडू |

रोखाचा रुढू | मार्गुचि पै ॥

3) क्रोध :- इतरांचे विद्यावैभव, चातुर्य, विनोदबुद्धी, ऐश्वर्य, भाग्य, उत्कर्ष पाहून जो मनात चडफडतो. त्याच्या जीवाची लाहीलाही होते. अशा दुर्गुणास “क्रोध“ संबोधतात.

विद्याविनोदविभवें| देखे पुढीलांची दैवे|

तंव तंव रोषु दुणावे| क्रोधु तो जाण ॥

4) पारुष्य :- ज्याच्या मनात घातक विचार सुरू असतात. ज्यांचे डोळे अत्यंत घातक असतात. बोलणे निखाऱ्यासारखे भयंकर. सर्व क्रिया किंवा कर्म करवतीप्रमाणे तीक्ष्ण, ज्यामुळे इतरांना भयंकर त्रास होऊ शकतो. इतरांना सतत त्रास देण्याचाच ज्याच्या तनामनात विचार असतो मशा अधम गुणास “पारुष्य” म्हणतात.

5) अज्ञान :- “बुद्धीच्या विचारस्वरूप कर्माला चांगले-वाईट न कळणे” यास अज्ञान म्हणतात. जन्माला येण्यासाठीचा उद्देश ज्याला कधीच कळला नाही. ज्यानं क्षणाक्षणाच्या कर्तव्यकर्मातून निर्माण होणाऱ्या इष्टानिष्ट परिणामांचा विचार केलाच नाही तो दुर्गुण म्हणजे “अज्ञान.”

आतापर्यंत सांगितलेल्या सहा आसुरी दुर्गुणांप्रती जागृत राहणाऱ्याचे जीवन सद्गुणांप्रती आकर्षिले जाते. सद्गुणांच्या पालनास जेवढा अभ्यास लागतो, त्याहून अधिक कष्ट दुर्गुणांपासून दूर राहण्यास लागतात. सद्गुण कष्ट साध्य आहेत, तर दुर्गुण अलिप्तता ही अतिकष्टसाध्य आहे. एखादेवेळेस सद्गुणा भेटले नाही तरी जीवन धन्य होईल, गरज आहे फक्त आसूर दुर्गुणांना विसर्जीत करण्याची. चला तर नववर्षाचा संकल्प करून दुर्गुण विसर्जनाचा वीडा उचलूयात !!!!

- रामकृष्ण हरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT