

कृष्णा जाधव : मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
अहंकाराला जाणणे एवढेच जरी समजले आणि आचरणात आणले तरी आपण भगवंताला आपलंस केलं, हे त्रिवार सत्य. ‘अहंकार’ समजणे एवढं सोपं नाही, पण अवघडही नाहीच नाही. अगदी सोप्पी असणारी गोष्ट भल्या-भल्यांना जमत नाही, हे त्रिवार सत्य. अहंकाराचा लय तिथेच आत्मज्ञानसूर्याचा उदय. एवढा सोपा परमार्थ सारांश समजायला कैक जन्माची पुण्यायी आणि आत्मसात करायला पुण्याई तर हवीच शिवाय गुरुकृपा आणि भगवंत इच्छाही. हजारो वर्षांच्या आध्यात्मशास्त्र विद्येत अनेक तत्त्ववेत्ते होवोन गेले, पण माऊलींसारखा विरळाच. आमचं भाग्य ते आम्हाला सद्गुरू म्हणून लाभले. त्यांचा आशीर्वाद श्री ज्ञानेश्वरी रूपाने तुमच्या- माझ्या मस्तकी आहे. मागील लेखात आपण याविषयी चिंतन केलं. आजच्या लेखात क्षर आणि अक्षर या तत्त्वांची मांडणी.
॥ श्री ॥
पंधराव्या अध्यायाच्या अत्यंत महत्त्वाच्या तत्त्वचितंनावर आज आपले निरूपण होणार आहे. खरंतर हा तत्त्वचिंतनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने त्याला समजण्यासाठी चित्ताची एकाग्रता करून लाभ घेण्याची मी आपणास नम्रपणे विनंती करतो.
आजच्या निरूपणात सृष्टीच्या रचनेचे गुपित उलगडले जाणार आहे. आपले खरे स्वरूप आपल्या स्वतःलाच पाहावयास मिळणार आहे. आपला परिचय आपणास होणं हे प्रत्येकास आवडणार आहे.
या सृष्टीत ‘क्षर’ आणि ‘अक्षर’ असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. सर्व सृष्टी, विश्वात जे-जे दृष्टीगोचर आहे ते नाशिवंत म्हणजे ‘क्षर’ आणि जीवात्म्याला ‘अक्षर’ (अविनाशी) म्हटले जाते. संसाररूपी (सृष्टी) राजधानीत जीव आणि आत्मा नांदत असतात. जीवात्म्याच्या सदैव भ्रमंतीस जन्म-मरण म्हणतात.
‘क्षर’ म्हणजे काय? त्याचा संपूर्ण परिचय करून घेऊ यात. क्षर म्हणजे ‘महत्तत्त्व’. ‘अहंकारादि’पासून अगदी सुक्ष्मातीसूक्ष्म वस्तू, पदार्थ होय. आध्यात्मिक पातळीवर श्री ज्ञानदेवांनी महत्तत्त्व विषद करताना म्हटले आहे की ‘प्रकृती’ (पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार) जेव्हा पुरुषाच्या (अनादि चैतन्य, शुद्ध चैतन्य) सान्निध्यात येते, तेव्हा प्रथम बुद्धी म्हणजे ‘महत्त’ उदयास येते. बुद्धीच्या ठिकाणी विवेक-अविवेकाचा संग्राम घडतो. महत् हे सर्व ज्ञानाचे मूलस्त्रोत आहे. यामधूनच अहंकाराचा जन्म होतो. अहंकारामधून पंचमहाभूते, इंद्रिये आणि मन निर्माण होते. म्हणूनच जीवनाचा अगदी मुळाशी जाऊन सूक्ष्म विचार करताना बुद्धीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच माऊली हरिपाठातही म्हणतात.
बुद्धीचे वैभव, अन्य नाहीं दुजें|
एका केशवराजे सकळ सिद्धी ॥
भगवंत आणि जीवात्मा यांना जोडणारा ‘सेतू’ म्हणजे ‘बुद्धी’ होय. आध्यात्मात ‘बुद्धीप्रामाण्याला’ किती महत्त्वाचे स्थान दिले आहे, हे मला याठिकाणी अधोरेखित करायचे आहे.
1. क्षर किंवा महत्तत्त्व साधकासाठी खालील कारणांसाठी उपयुक्त ठरते.
2. महत्तत्त्व समजणे म्हणजे ‘ज्ञान’ आणि ‘अज्ञान’ यांच्या सीमेवर उभे राहणे.
3. साधक जेव्हा ‘मनशुद्धी’ आणि ‘बुद्धीशुद्धी’ यांच्या सहाय्याने ‘चित्तशुद्धी’ प्राप्त करतो तेव्हा त्याच्यातील महत्तत्त्व प्रकट होते.
4. चित्तशुद्धीने विवेक जागृत होऊन सत्याचा साक्षात्कार होतो. या योगेच आत्मा-प्रकृती भेद समजतो.
‘आत्मज्ञान’ हा अध्यात्माचा प्रारंभबिंदू आहे. म्हणूनच माऊली श्री ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीत म्हणतात -
ॐ नमोजी आद्या| वेद प्रतिपाद्या |
जय-जय स्वसंवेद्या| आत्मरूपा ॥
श्री ज्ञानेश्वरी मधले तत्त्व हे आत्मरूपास तुम्हा-आम्हांस समजण्यासाठी माऊलींनी मांडलेले आहेत, त्यातील प्रत्येक सिद्धांत बुद्धीप्रामाण्याच्या निष्कर्षावर प्रखर तेजाने प्रकट झालेले आहेत. तर किंवा महत्तत्त्व समजण्यासाठी खालील संज्ञांचे स्वरूप, उत्पत्ती व कार्य समजून घेऊ यात.
पुरुष :- याचे स्वरूप म्हणजे ‘शुद्धचैतन्य’, उत्पत्ती ‘अनादि’ आणि कार्य, जीवाच्या ठायी ‘साक्षी’ भावाने सदैव ‘मृत्यूपर्यंत’ जागृत राहून त्याच्या कर्माची नोंद घेणे.
प्रकृती :- हिचे स्वरूप ‘अविद्या किंवा मायारूप’ असे आहे. हिची उत्पत्ती ‘अनादि’ आणि कार्य म्हणजे ‘सृष्टीचे कारण’ हीच आहे.
महत्तत्त्व :- याचे स्वरूप म्हणजे ‘बुद्धी’ किंवा विवेक रूप होय. महत्तत्त्वाची उत्पत्ती ही प्रकृतीपासून होते. विवेक किंवा निर्णयशक्ती हेच याचे कार्य आहे.
अहंकार :- ‘मी’ भाव हेच याचे स्वरूप. याची उत्पत्ती महत्तत्त्वापासून होते. आत्मभाव निर्माण करणे हेच याचे मुख्य कार्य होय.
थोडक्यात, ‘क्षर’ म्हणजे जे काही स्थावर-जंगम या विश्वात आहे, जे दृष्टीगोचर आहे, जेवढे म्हणून पंचमहाभूत आणि प्रकृतीपासून तयार झाले आहे. एवढंच नाही तर जे-जे त्रिगुणातीत आहे अर्थात ‘विश्व’ आणि ‘ब्रह्मांड’ यामधील, चराचर म्हणजे ‘क्षर’ होय.
जे काही सानें थोर| चालतें अथवा स्थिर|
किंबहुना गोचर| मनबुद्धीसि जें॥
जेतुले पांचभौतिक घडतें| जे नामरूपा सापडतें|
गुणत्रयाच्या पडतें | कामठां जे॥
आज आपण ‘क्षर’ म्हणजे काय ते जाणण्याचा प्रयत्न केला.
- पुढच्या लेखात ‘क्षर’ यामुळे काय घडते? ते पाहू.
रामकृष्णहरी