Dhamani Dam pudhari photo
ठाणे

Dhamani Dam : धामणी धरण तुडुंब; पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू

धरण ९२ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कासा : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या मोठा प्रकल्पातील धामणी धरण ९२ टक्क्यांहून अधिक भरले असून धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवार (२२ जुलै) सकाळी ७ वाजल्यापासून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मिटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

पालघर पाटबंधारे विभाग, मनोरचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती दिली आहे. सध्या धरणातील पाणीपातळी १२३.६० मीटर असून १११.६६९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण सुमारे ९२.२५ टक्के भरले असून परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक कायम आहे.

पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धामणी धरणाचे १, ३ आणि ५ क्रमांकाचे वक्राकार दरवाजे प्रत्येकी ४० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्याद्वारे सुमारे २,८२० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. आवश्यकता भासल्यास वीजगृहातूनही अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच शेती, जनावरे आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गाचे प्रमाण वाढविण्यात किंवा कमी करण्यात येऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामपंचायती आणि संबंधित यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालघर पाटबंधारे विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT