: कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरील अत्यंत वर्दळीचा तिसगांव नाका आणि तिसगांव प्रवेशद्वारासमोरील रस्त्याची अवस्था बिकट Pudhari
ठाणे

Kalyan Potholes | कल्याणच्या तिसगांव नाक्यासह प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर जीवघेणे खड्डे, अपघातांचा धोका वाढला

अपघातांचा धोका वाढल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Tisgaon Naka Road

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरील अत्यंत वर्दळीचा तिसगांव नाका आणि तिसगांव प्रवेशद्वारासमोरील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. पावसामुळे तर या दोन्ही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांसह परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या खड्ड्यांमधून वाहन चालवताना दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी चालकांची मोठी कसरत होत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अपघातांचा धोका वाढल्याने वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे पुणे लिंक रोडचा बहुतांश भाग काँक्रीटचा आहे. मात्र तिसगांव नाका आणि प्रवेशद्वारासमोरील रस्ता पेव्हर ब्लॉकचा करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी मोठे खड्डे पडतात आणि या भागातील रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालकांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. खड्ड्यांमध्ये आदळून वाहनांसह रिक्षांचे सस्पेन्शन, टायर्स, शॉकॲब्झॉरवरसह इतर सुटे भाग वारंवार खराब होतात. वाहनांच्या दुरूस्तीसाठी हजारो रूपये खर्च करावे लागत असल्याची खंत रिक्षाचालकांसह वाहनचालकांनी व्यक्त केली.

दुचाकीस्वारांनाही तोल जाऊन खड्ड्यांत आदळण्याचा धोका आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यांवर अनेकदा किरकोळ अपघातही झाले आहेत. पेव्हर ब्लॉकऐवजी या दोन्ही ठिकाणी कायमस्वरूपी काँक्रीटचा रस्ता करावा. त्यामुळे दरवर्षी येणारी खड्ड्यांची समस्या कायमची सुटेल, याकडे स्थानिक रहिवाशांनी शासन/प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले आहे. परंतु या मागणीकडे स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजीसह चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

रस्ते बांधकामाच्या दर्जावार शंका

दरवर्षी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शहरांतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी कोट्यवधी रूपयांचे कंत्राट देते. हा कंत्राट दरवर्षी सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या एकाच ठेकेदाराला दिला जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. एवढा निधी खर्च करूनही दर पावसाळ्यात त्याच त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडत असल्याने कामाच्या दर्जासह कंत्राट प्रक्रियेबाबत रहिवाशांकडून शंका उपस्थित केली आहे. या कामांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि निकृष्ट दर्जाच्या कामावर कडक कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

पुणे लिंक रोडवर ताण

तिसगांव नाका आणि प्रवेशद्वार परिसर हा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच नवी मुंबईकडे जाणाऱ्या हजारो वाहनांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. पुणे लिंक रोडवर दळणवळण आणि वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे जीवघेणे खड्डे तातडीने बुजवून या ठिकाणी कायमस्वरूपी काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी, रिक्षाचालक आणि वाहनचालक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT