मिरा रोड (ठाणे) : मिरा-भाईंदर शहरात अनेक डान्स अनेक डान्स बार हे अनधिकृत बांधकाम करून नियमांचे उल्लंघन करत पहाटेपर्यंत सुरू आहेत. महापालिका व पोलीस प्रशासन कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
मीरा-भाईंदर शहरात अनेक डान्स बार व लॉज हे अनधिकृत बांधकाम करून बनवण्यात आले आहेत. महापालिकेने काही काही बारवर तोडक कारवाई देखील केली आहे. तोडक कारवाई केल्यानंतर देखील शहरात अनेक बेकायदेशीर बार आणि लॉज पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे महापालिका व पोलीस प्रशासनाची अकार्यक्षमता आणि राजकारण्यांमधील संबंधामुळे यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या वर्षी, पुणे येथे पोर्श गाडीमुळे झालेला अपघात आणि मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांचे सेवन करत असल्याचे उघड झाल्यानंतर राज्यात सगळीकडे संताप व्यक्त केला जात होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महापालिका आणि पोलिस आयुक्तांना बेकायदेशीर चालणार्या बार, पब व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले होते. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील केम छो डान्स बार वर महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांनी स्वतः उभे राहून गेल्या वर्षी तोडक कारवाई केली होती. त्याबरोबर महापालिकेने इतरही अनधिकृत बांधकाम केलेल्या बार वर तोडक कारवाईची मोहीम सुरू केली. चार दिवसांत, महापालिकेने केम छो डान्स बार सह इतर अनेक बारची अनधिकृत बांधकामे तोडली. या मोहिमेचे सगळीकडे कौतुक करण्यात आले. मिरा भाईंदर शहरात शिंदे ‘बुलडोझर बाबा’ असे बॅनर झळकले होते. त्यावेळी स्थानिक राजकीय नेत्यांनी देखील त्याचे समर्थन केले होते. त्यानंतर काही महिन्यातच तोडक कारवाई करण्यात आलेले बार आणि लॉजचे पुन्हा बांधकाम करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासन अनधिकृत बांधकामावर कारवाई करते परंतु काही दिवसांत पुन्हा ती अनधिकृत बांधकामे ऊभी रहातात हे महापालिका प्रशासनाचे अपयश असल्याचे बोलले जात आहे. या डान्स बारमुळे तरूण पिढीचे आयुष्य उध्वस्त होत आहे. अनेक कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या अनधिकृत व नियमांचे उल्लंघन करून चालणार्या डान्स बार, पब व हुक्का पार्लरवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनाकडून केली जात आहे.
महापालिकेने अनेक बार व लॉजवर तोडक कारवाई केल्यानंतर महापालिका अधिकार्यांनी बार मालकाबरोबर आर्थिक संगनमत करून नियम धाब्यावर बसवून दुरूस्ती परवानगी दिली आहे. त्यामुळे दुरूस्ती परवानगीच्या आड बिनधास्तपणे अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या सर्व दुरूस्ती परवानगी दिलेल्या अधिकार्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.