Dahisar Kashigaon Metro Pudhari
ठाणे

Dahisar Kashigaon Metro: दहिसर–काशिगाव मेट्रोचा 3 एप्रिलला शुभारंभ; मिरा-भाईंदरकरांना मोठा दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; मेट्रो श्रेयावर भाजप-शिवसेनेत स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : राजू काळे

दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्पातील दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचा मुहूर्त येत्या 3 एप्रिल रोजी ठरला आहे. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत केले जाणार असून हा बहुप्रतिक्षित प्रकल्पामुळे मिरा-भाईंदरमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दैनिक पुढारीने 18 मार्च रोजी मेट्रोचा पहिला टप्पा केव्हा सुरु होणार; शहरातील प्रवाशी मेट्रो सुरु होण्याच्या प्रतिक्षेत या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाची पाहणी करून त्याचे लोकार्पण येत्या एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र 29 मार्च रोजी आ. नरेंद्र मेहता यांनी या बहुप्रतिक्षित प्रकल्पाचे लोकार्पण 3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र त्याचे श्रेय नेमके कोणाचे, यावरून सध्या शिवसेना व भाजपमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे.

मेहता यांनी या मेट्रो प्रकल्पाला भाजपच्याच म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच सत्ताकाळात सुरुवात झाल्याचा दावा केला असून त्यांचे मेट्रो मॅन नामक बॅनर्स शहरभर झळकाविण्यात आले आहेत. तर हि मेट्रो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याच पाठपुराव्याने सुरु होत असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तसे बॅनर्स देखील शहरभर झळकविण्यात आल्याने महायुतीतील मित्रपक्षांमध्येच मेट्रोच्या श्रेयाची चढाओढ सुरु झाल्याचे निदर्शनास आले आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण यंदा निश्चित झाले असले तरी यापूर्वी त्याचे अनेक मुहूर्त हुकले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून मिरा-भाईंदरकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ते स्वप्न येत्या 3 एप्रिल रोजी प्रत्यक्षात उतरणार आहे. दहिसर ते काशिगाव दरम्यान सुरु होणाऱ्या मेट्रोचा फायदा प्रामुख्याने मीरारोड व पश्चिम महामार्गावरील प्रवाशांना होणार आहे. येथील प्रवाशांना इंटरचेन्ज सुविधेमुळे थेट कुलाबापर्यंत प्रवास करता येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमधील गर्दी तसेच दहिसर चेकनाका दरम्यानच्या वाहतूक कोंडीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

प्रवास आरामदायी, जलद होणार

लोकल व रस्ते वाहतुकीद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काशिगाव ते दहिसर मेट्रो मार्गाचा पर्याय उपलब्ध होऊन त्यांचा प्रवास सुसह्य व आरामदायी तसेच जलद होणार आहे. याच मार्गावरून सेंट्रल रेल्वे लाईनवरील घाटकोपरला देखील प्रवास करता येणार आहे. यासाठी प्रवाशांना पश्चिम उपनगर तसेच मुंबईकडे जाण्यासाठी दहिसर मेट्रो स्थानकावर उतरून दहिसर ते अंधेरी मेट्रोतुन प्रवास करावा लागणार आहे. तर मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना देखील दहिसर मेट्रो स्थानकावर उतरून दहिसर ते काशिगाव मेट्रोतून प्रवास करावा लागणार आहे. त्यांचा हा प्रवास सुमारे दिड तासावरून अवघ्या 40 मिनिटांवर येणार आहे.

दहिसर ते काशिगाव 16 रुपयात

तसेच दहिसर ते काशिगाव दरम्यान पांडुरंगवाडी, मिरागाव हि दोंन स्थानके असून दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या प्रवासाचा तिकीट दर सुमारे 16 रुपये इतका निश्चित करण्यात आला असून या दरम्यानच्या सुमारे अर्ध्या तासाचा प्रवास सुमारे 17 मिनिटांवर येणार आहे. यामुळे प्रवाशांना जलद, आरामदायी व प्रदूषणमुक्त प्रवास घडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT