भाईंदर : राजू काळे
दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा सध्याच्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्याच्या मुहूर्ताला ब्रेक लागल्याने हा टप्पा सुरू होण्यासाठी अनिश्चित कालावधी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे मिरा-भाईंदरमधील प्रवाशांचा अपेक्षाभंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दहिसर ते भाईंदर दरम्यानची मेट्रो रेल्वे दोन टप्प्यात सुरू करण्याचा निर्णय एमएमआरडीएने गतवर्षी घेतला होता. त्यातील दहिसर ते काशिगाव दरम्यानचा पहिला टप्पा गेल्या डिसेंबर 2025 मध्ये तर काशिगाव ते भाईंदर दरम्यानचा दुसरा टप्पा डिसेंबर 2026 मध्ये सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र पहिला टप्पा डिसेंबर 2025 नंतर फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू करण्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रन 14 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घेण्यात आली.
28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने सर्व शासकीय कामांचे सोहळे रद्द करण्यात आले. त्याचा फटका दहिसर ते भाईंदर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला देखील बसला. यामुळे फेब्रुवारी मध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोला ब्रेक लागला. परिणामी मिरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले असतानाच पहिल्या टप्प्यातील काही अत्यावश्यक कामे प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा पहिला टप्पा सुरू होण्यासाठी अत्यावश्यक ठरलेले मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने मेट्रोचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या मध्यान्हात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र त्याला तांत्रिक अडचणीमुळे हेतुपुरस्सर विलंब केला जात असल्याने त्यावर संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे मिरा-भाईंदरकरांचा मेट्रो प्रवास केव्हा सुरू होणार,
हे अद्याप गुलदस्त्यात असून त्याचा प्रवास सुलभ केव्हा होणार, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. वास्तविक पहिल्या टप्प्यावरील पश्चिम महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाला जोडून मेट्रो मार्गाखालील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मेट्रो सुरू झाल्यास त्या पुलाच्या बांधकामात तसेच मेट्रो मार्गात तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले. यामुळे पहिल्या टप्प्यातील मेट्रो सुरू होण्याचा मुहूर्त पुढे ढकलल्याचे तूर्तास स्पष्ट झाले आहे. यामुळे मिरा-भाईंदरमधील प्रवाशांचे वेळेत मेट्रो सुरू होण्याचे स्वप्नच राहणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दहिसर ते भाईंदर दरम्यानचा मेट्रो मार्ग सुरू झाल्यास मिरा-भाईंदरमधील प्रवाशांना प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊन त्यांना विनाअडथळा थेट अंधेरीपर्यंत विनाअडथळा वा जलद प्रवास करता येणार आहे. तसेच मेट्रो सुरू झाल्यास पश्चिम रेल्वेच्या लोकलवरील ताण कमी होऊन रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुद्धा सुसह्य होणार आहे. याचप्रमाणे दहिसर चेकनाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या मिरा-भाईंदरकरांना इंटरचेन्ज सुविधेनुसार मेट्रो-1चा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट स्थानक 3 द्वारे थेट कुलाबापर्यंत प्रवास करता येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक व टर्मिनस आणि दक्षिण मुंबईतील मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी देखील मेट्रोचा पर्याय इंटरचेन्जद्वारे उपलब्ध होणार आहे. मात्र दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यालाच ब्रेक लागल्याने शहरातील प्रवाशांना तूर्तास प्रतीक्षाच करावी लागणार आहे.