Dahisar Bhayandar Coastal Link Road Project Update
भाईंदर : केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपल्या अखत्यारीतील जमीन राज्य सरकारला हस्तांतरीत केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा कोस्टल लिंक रोड तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. यामुळे येत्या 3 वर्षात हा कोस्टल लिंक रोड तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मिरा-भाईंदरमधील अंतर कोस्टल रोड मार्गे अवघ्या अर्ध्या तासावर येणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
यासाठी सरनाईक यांनी गेल्या 5 वर्षांपासून सातत्याने केंद्रीय मिठागार मंत्रालय व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याने दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या 60 मीटर रस्त्यांमधील 53.17 एकर जागा केंद्रीय मिठागार मंत्रालयाने राज्य शासनाच्या माध्यमातून मीरा- भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यास मान्यता दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यामुळे भविष्यात दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई-विरारकडे जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांना सांगितले.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हा कोस्टल लिंक रोड उत्तन पर्यंत आणण्यात येणार आहे. तेथून दहिसर ते भाईंदर हा 60 मीटर रुंदीचा रस्ता भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदानापर्यत येवून पुढे तो वसई-विरार शहराला जोडला जाणार आहे. मुंबई महापालिकेने या कोस्टल लिंक रडची निविदा यापूर्वीच काढली असून त्याचे काम मेसर्स एलअॅडटी या कंपनीला देण्यात आले आहे. हा कोस्टल लिंक रोड पुढील तीन वर्षात पूर्ण होणार असून त्यासाठी सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिकेकडून केला जाणार आहे.
हा कोस्टल लिंक रोड भाईंदरच्या उत्तन येथून विरारकडे समुद्रकिनार्यावरून जाणार्या कोस्टल रोडला जोडला जाणार असून हा मार्ग उत्तन ते दहिसर आणि तेथून मीरा-भाईंदर मार्गे वसई विरारकडे जमिनीवरून जाणार आहे. कारण उत्तन येथील सी लिंकला स्थानिक मच्छीमारांनी विरोध केल्यानंतर त्यांची बाजू सरनाईक यांनी राज्य शासनाकडे मांडल्याचे सांगण्यात आले.
मुंबई शहराचे उपनगर म्हणून नवी ओळख
भविष्यात हा मार्ग वसई-विरारहून डहाणू येथील वाढवण बंदरापर्यंत जाणार आहे. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फायदा मीरा-भाईंदर शहराला होणार असून हे शहर, मुंबई महानगराच्या अधिक जवळ येणार असल्याचे त्यांनी म्हटले. याचप्रमाणे भविष्यात मिरा-भाईंदर शहर हे मुंबई शहराचे उपनगर म्हणून आपली ओळख निर्माण करेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.