भाईंदर : राजू काळे
येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. यावेळी पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांचा सागर उसळणार असल्याने या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांकडून विविध धार्मिक भक्त निवासात रूम साठी धावपळ सुरू आहे. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी काही सायबर फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती सक्रिय झाल्या आहेत. या व्यक्तींकडून ऑनलाईन रूम बुक करणाऱ्या भक्तांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.
या विरोधात राज्याच्या सायबर सेलमध्ये तक्रारी नोंद करण्यात येत असून विठ्ठल भक्तांची फसवणुकीतून लुबाडलेली रक्कम त्यांना परत करण्यासाठी हा सायबर सेल प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. येत्या आषाढी एकादशीला पंढरीत भक्तांची मोठी गर्दी होणार आहे. वारी करणारे भक्त मिळेल त्या मोकळ्या जागेत वस्ती करून राहतात. तर काही भक्त पंढरीत असलेल्या विविध धार्मिक संस्थांच्या भक्त निवासात रूम मिळण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
यासाठी ते ऑनलाईन प्रणालीचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. त्याचाच गैरफायदा घेत काही सायबर फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती सक्रिय झाल्या आहेत. या व्यक्ती विविध धार्मिक संस्थांच्या भक्त निवासात व्यवस्थापक अथवा रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असल्याचे ऑनलाईन प्रणालीद्वारे रूम बुक करणाऱ्या भक्तांना सांगतात. त्यांना व्हाॅट्सॲपद्वारे विविध रूमच्या भाड्याचा तपशील व्हाॅट्सॲपवर पाठविला जातो. नंतर त्यांना विश्वासात घेऊन रूमच्या भाड्याची रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यासाठी स्कॅनर पाठविले जाते.
हे स्कॅन करून रूमचे भाडे पाठविल्यावर काही वेळेतच भक्तांना रूम बूक झाल्याची बनावट पावती पाठविली जाते. त्या पावतीबाबत भक्त अनभिज्ञ असल्याचा फायदा घेत सायबर फ्रॉड करणारी व्यक्ती भक्तांना पाठविलेली रक्कम एकत्र नव्हे तर दोन भागांमध्ये पाठविण्यास सांगते. तर एकत्रित पाठविलेली रक्कम भक्तांना रिफंड करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात येते. पावती मिळाल्याच्या विश्वासाने भक्तांकडून पुन्हा २ भागांमध्ये रूमच्या भाड्याची रक्कम पूर्वीच्या स्कॅनरद्वारेच पाठविली जाते.
अगोदरची रक्कम परत मिळवण्यासाठी पावतीवर असलेल्या बुकिंग सक्सेस पेंडिंग क्रमांक स्कॅनर द्वारेच पाठविण्यास सांगितले जाते. म्हणजे पूर्वी जो स्कॅनर पाठविण्यात आला तो स्कॅनर पुन्हा स्कॅन करून रक्कमेच्या ठिकाणी पावतीवरील ५ आकडी क्रमांक लिहून त्याखालील ऍड नोटमध्ये तोच क्रमांक लिहून पाठविण्यास सांगितले जाते. यातच भक्तांची फसवणूक होते. ते विश्वासाने क्रमांक पाठवतात पण तो क्रमांक नसून रक्कम असते, हे त्यांच्या ध्यानी नसते. ते क्रमांक पाठवतात व त्यांचे हजारो रुपये सायबर फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जातात. नंतर ती व्यक्ती नेटवर्क बंद करून नॉट रिचेबल होते. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भक्त सायबर सेलकडे तक्रार करताना दिसू लागले आहेत.