Cyber Blackmail Kalyan Pudhari
ठाणे

Cyber Blackmail Kalyan: ब्लॅकमेलिंगमुळे हैराण झालेल्या 45 वर्षीय कल्याणकराने संपविले जीवन

दोन महिन्यांनी उकलले गूढ; कोळसेवाडी पोलिसांकडून चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : सायबर ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून एका 45 वर्षीय कल्याणकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्तीचे अश्लील फोटो तयार करून ते फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत अज्ञात इसमाकडून पैशांची मागणी केली जात होती. सततच्या धमक्यांमुळे मानसिक तणाव वाढल्याने कल्याणकराने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोळसेवाडी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी परिसरात राहणारे हेमंत दयाशंकर पांडे (45) यांनी दोन महिन्यांपूर्वी कैलासनगर येथील आपल्या जुन्या घरातील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हेमंत यांनी अचानक आत्महत्या का केली ? याबाबत कुटुंबीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हेमंत यांचे थोरले बंधू राजेश पांडे यांनी यासंदर्भात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

व्यापातून सुटण्यासाठी मित्रांकडे पैशांची मागणी

राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत यांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी कुटुंबीयांनी त्यांच्या मित्रांशी संपर्क साधला. त्यावेळी एका मित्राने हेमंत कोणत्या तरी सायबर गुन्ह्याच्या जाळ्यात अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली. या साऱ्या व्यापातून सुटण्यासाठी मित्रांकडे पैशांची मागणी केली. तातडीने दोन लाख रूपयांची गरज असल्याचे त्यांनी मित्रांना सांगितले होते. त्यासाठी त्यांनी मित्राकडे एक लाख साठ हजार रूपयांची मागणी केली होती. तर उर्वरित चाळीस हजार रूपये स्वतःकडे असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

सायबर तज्ञांची मदत घेणार

कुटुंबियांनी हेमंत यांच्या बँक खात्याची तपासणी केली असता एप्रिल 2025 ते जून 2025 या कालावधीत त्यांच्या खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे आढळून आले. ही रक्कम अज्ञात व्यक्तीने आपल्या खात्यावर वळती करून घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारे सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीसह बदनामीच्या भितीमुळे हेमंत पांडे मानसिक तणावात होते. अखेर या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. कोळसेवाडी पोलिस सायबर ब्लॅकमेलिंगच्या या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.

मोबाईलच्या मेसेजमध्येही धमक्या

कुटुंबीयांनी हेमंत यांच्या मोबाईल फोन आणि ई-मेलची तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. एका ईमेलद्वारे त्यांना त्यांचे अश्लील फोटो पाठविण्यात आले होते. हे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीकडून पैशांसाठी तगादा लावण्यात येत होता. पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी सतत दिली जात होती. मोबाईलच्या मेसेजमध्येही अशाच प्रकारच्या धमक्या आढळून आल्या. हा सारा प्रकार पाहून कुटुंबीय अवाक्‌‍ झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT