Congress Samvidhan Bachao Rally Thane
ठाणे : राज्य घटनेच्या निमिर्तीची प्रक्रिया सुरु असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोलवलकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र पाठवून, देशाचे संविधान मनुस्मृतीनुसार लिहिले जावे अशी सूचना केली होती. मनुस्मृती व बंच ऑफ थॉट्सला महत्व देणाऱ्या भाजपाला आज संविधानाचा पुळका आला आहे, हे फक्त पुतणा मावशीचे प्रेम आहे. राज्यात आलेले असंवैधानिक सरकार हे सुद्धा ठाण्यातून आले होते. त्या ठाण्यात कायदा व सुव्यवस्थाही बिघडलेली असून संविधान धोक्यात आलेले आहे. म्हणून संविधान रक्षणाचा संदेश राज्यभर देण्यासाठी काँग्रेसने ठाण्यातून संविधान बचाव भव्य रॅली काढल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रॅलीला संबोधताना केले.
लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसने ठाण्यात भव्य संविधान बचाव रॅली काढली. या रॅलीत महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खा. शोभा बच्छाव, खा. प्रणिती शिंदे, खा. रविंद्र चव्हाण, खा. शिवाजी काळगे, आमदार भाई जगताप, माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, रमेश बागवे, प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सुनिता गावंडे, मुजफ्फर हुसेन, चरणसिंग सप्रा, मोहन जोशी, ॲड. गणेश पाटील, अॅड. संदेश कोंडविलकर, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन संविधान बचाव रॅलीची सुरुवात करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी उपस्थितांना संविधान बचावची शपथ दिली.
त्यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान रद्द करून मनुस्मृती आणायची आहे. पण सध्या ते सत्तेत असून संविधान व लोकशाही बचावचा नारा देत मोर्चा काढत आहेत, हे हास्यास्पद आहे. भाजपाचे संविधान प्रेम हे वरकरणी दाखवणाचे प्रेम आहे. भाजपा सरकार मागील १३ वर्षांपासून संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.
पुण्यात कोर्टाच्या आवारात एका व्यक्तीवर गंभीर हल्ला करण्यात आला ही घटना राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. पुण्याला कोयता नगरी करायची आहे का? असा संतप्त प्रश्न विचारून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, त्यांना कशाचेही भय राहिलेले नाही. राज्याला पूर्णवेळ व सक्षम गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद म्हणाले भारतीय संविधानाने सर्व जाती धर्मांना, महिलांना, वंचित समाजाला समान अधिकार व हक्क दिले आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, मतदानाचा अधिकार दिला आहे, पण भारतीय जनता पक्षाचे मोदी- शाह सरकार मात्र सर्वसामान्य जनतेचे हे अधिकारच काढून घेण्याचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आज धोक्यात आले असून हे संविधान वाचवणे ही आजची गरज आहे.
विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यावेळी म्हणाले की, तीन-चार वर्षापूर्वी लोकशाहीची हत्या ठाण्यातूनच झाली हे लक्षात घेऊन संविधान वाचवण्यासाठी ही रॅली ठाण्यातून काढण्यात आली आहे. वोटचोरी होत आहे, गोकुळमधील सत्ताही भाजपाने चोरली. जनतेने निवडून दिल्यानंतर सरकार चालवताना ते संविधानानुसार चालवले पाहिजे पण भाजपा संविधानाला मानत नाही. आपण लढलो तर जिंकू शकतो, हे लक्षात ठेवा. राज्यात शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर संविधान वाचवले पाहिजे.