College girl dies of snake bite in Shahapur
शहापूर/किन्हवली : पुढारी वृत्तसेवा
शहापूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सर्पदंशाने एका 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. तरुणी घरात झोपली असताना मध्यरात्री मण्यार जातीच्या विषारी सापाने तिला दंश केल्याने तिचा तडफडून मृत्यू झाला. शहापुरात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.
रोहिणी हरिश्चंद्र निमसे असे मृत पावलेल्या 19 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती शहापूर येथील आरमाईट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री ती आपल्या घरात झोपली होती. पहाटे 3 वाजताच्या सुमारास तिच्या पायाजवळ काहीतरी वळवळ झाली. पण, तरुणीला काही कळायच्या आत तिला मण्यार जातीच्या सापाने दंश केला.
मुलीला सर्पदंश झाल्याचे समजताच मुलीच्या वडिलांनी तिला तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
तिथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू बेड आणि इतर सोईसुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तिला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मुलीचे कुटुंबीय तिला घेऊन तातडीने ठाण्याच्या दिशेने निघाले.
मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. रोहिणी निमसे या 19 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.