मुंब्रा येथे ठाणे एसआयटी पथक पोहचले आहे. pudhari news network
ठाणे

Akshay Shinde : अक्षय शिंदे चकमकप्रकरणी सीआयडी पथक मुंब्रामध्ये दाखल

अक्षय शिंदे चकमकप्रकरणी सीआयडी पथक मुंब्रामध्ये दाखल

पुढारी वृत्तसेवा
ठाणे : सुरेश साळवे

पुन्हा एकदा हैदराबाद एन्काउंटरची आठवण सोमवारी (दि.23) संध्याकाळी ताजी झाली. ठाण्याच्या मुंब्रा बायपासवर अत्याचाराच्या आणि शाळकरी मुलींच्या लैंगिक छळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चौकशीत मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेने आरोप प्रत्यारोपाचे एकच काहूर माजले. अन स्वरक्षणार्थ गोळीबारात झालेल्या चकमक ही एन्काउंटर की हत्या? या प्रश्न चिन्हात अडकलेले आहे.

अक्षय शिंदे याचा मृतदेह मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मंगळवारी (दि.24) घटनास्थळी ठाणे एसआयटी पथक पोहचले तर दुपार नंतर सीआयडी पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात आणि घटनास्थळी पोहचले आणि चौकशी सुरु झाली आहे.

सोमवारी (दि.23) घडलेल्या घटनेचे गंभीर पडसाद उमटले राजकीय आरोप प्रत्यारोप सोबतच नागरिकांमध्ये एकच चर्चेला उधाण आलेले पाहायला मिळाले. एकंदर अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर बाबत विभिन्न चर्चा रंगल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपासवर घडलेली चकमक हि वादाच्या भोवर्‍यात सापडलेली आहे.

या चकमकीत एकूण चार गोळीबार करण्यात आलेले होते. त्यातील तीन राउंड हे आरोपी अक्षय शिंदे यांनी झाडले. तर एक राउंड स्वसंरक्षणार्थ एसआयटी पथकातील संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली. आणि चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. एवढे मोठे एन्काउंटर नाट्य मुंब्रा बायपासवर घडले. मात्र गोळीबाराचा आवाजही आसपासच्या लोकांना आला नाही. हे विशेष या घटनेत घडले. त्यामुळे एसआयटी पथकाच्या अधिकार्‍याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा वापर सायलेन्सर लावून करण्यात आला काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तर मोठी चर्चा मुंब्रा वाय जंक्शन आणि धबधबा परिसरातील मुंब्रावासीयांमध्ये रंगलेली आहे. तर ज्या वाहनामध्ये चकमक झाली. त्या वाहनामध्ये चार पुंगळ्या सापडल्याची माहिती सूत्रांद्वारे उपलब्ध आहे.

एसआयटी पथकाची स्थापना आणि कारवाई

बदलापूर परिसरातील दुर्दैवी घटना त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी केलेली दिरंगाई आणि बदलापुरात उसळलेल्या जनउद्रेक यामुळे ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आलेली होती. या पथकात आयुक्तालयाच्या विविध शाखेतील एक अधिकारी यांचा समावेश करून घेण्यात आला होता. याच पथकातील संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेला टिपले. तर अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी झाले. त्यानंतर संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे याच्यावर स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला.

घटनास्थळी एसआयटी, मुंब्रा येथे सीआयडी

मंगळवार (दि.24) रोजी सकाळी एसआयटी पथक मुंब्रा येथील घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळाची पाहणी करून ज्या व्हॅनमध्ये फायर झालेल्या चार राउंडच्या पुंगळ्या सापडल्या. त्याची पहाणी केली. तर दुपारनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात सीआयडी पथक दाखल झाले. मुंब्रा पोलीस ठाण्यात चौकशी करीत घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचे छायाचित्रण करीत घटनास्थळाचे व्हिडीओ चित्रणही करण्यात आलेले आहे. तर पोलीस व्हॅनची तपासणी आणि पाहणी करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणात सीआयडी चौकशीचा ससेमिरा सुरु झाल्याचे चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT