Child Labour Girls Pudhari File Photo
ठाणे

Child Labour Girls: महिलादिनाच्या गजरात डोंबिवलीत वेदनादायी वास्तव; चिमुरड्या मुली दप्तराऐवजी गजरे विकताना

स्टेशन परिसरात बालमजुरीचे चित्र; शिक्षणाच्या वयात रस्त्यावर विक्री, भीक आणि जीवघेण्या कसरती

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली शहर : संस्कृती शेलार

जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक आणि सुशिक्षित शहरात मात्र वेगळेच चित्र समोर येत आहे. शहरातील काही भागांत लहान चिमुरड्या मुली शाळेच्या दप्तराऐवजी हातात गजरे-फुलांची टोपली घेऊन रस्त्यावर विक्री करताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी चिमुरडी मुले-मुली रस्त्यांवर भीक मागताना सर्रास आढळून येतात. महिलादिनाच्या घोषणांमध्ये ‌‘लेकींच्या सक्षमीकरणा‌’चा जयघोष होत असताना, प्रत्यक्षात या चिमुकल्या लेकींचे बालपण मात्र जगण्याच्या संघर्षात हरवत असल्याचे वास्तव दिसून येत आहे.

डोंबिवलीतील स्टेशन परिसर, फडके रोड तसेच शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये पाच ते दहा वर्षांच्या कोवळ्या वयातील मुली ऊन-धुळीची तमा न बाळगता वस्तू विकताना दिसतात. शिक्षणाच्या वयात त्यांच्या खांद्यावर दप्तराऐवजी जबाबदाऱ्यांचे ओझे असल्याचे चित्र पाहायला मिळते. काही मुली फुले-गजरे विकताना दिसतात, तर काही कोवळ्या मुली रस्त्यावर भीक मागताना दिसून येतात. गर्दीच्या चौकात, स्टेशन परिसरात आणि बाजारपेठेत दिवसभर उन्हात उभे राहून उपजीविकेसाठी झगडणाऱ्या या मुलींचे बालपण अक्षरशः रस्त्यावरच घडताना दिसते. शिक्षण, खेळ आणि निरागस बालपण अनुभवण्याच्या वयातच या मुली जीवनाच्या कठोर वास्तवाला सामोऱ्या जात आहेत. बालहक्कांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे अस्तित्वात असतानाही या मुली शाळेबाहेर का आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते गरिबी, स्थलांतरित कुटुंबांची परिस्थिती, अस्थिर रोजगार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष ही यामागील प्रमुख कारणे असू शकतात. मात्र डोंबिवलीसारख्या शहरात असे चित्र दिसणे चिंताजनक मानले जात आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जात असताना, जर मुलींनाच शिक्षणापासून दूर ठेवून त्यांना फेरीवाला व्यवसायात गुंतवले जात असेल, तर महिलादिनाच्या घोषणांचा अर्थ काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बालहक्कांसाठी कायदे असतानाही या चिमुकल्या लेकी मुख्य प्रवाहापासून दूर का आहेत, असा संतप्त प्रश्नही अनेकजण विचारत आहेत.

या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, बालकल्याण विभाग आणि शिक्षण विभागाने तातडीने दखल घेऊन अशा मुलींना शोधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महिलादिना निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या घोषणांबरोबरच समाजातील या ‌‘लेकीं‌’च्या भविष्याचाही विचार करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पोटासाठी जीवघेण्या कसरती

डोंबिवलीच्या रस्त्यांवर ‌‘डोंबारी खेळ‌’ करणाऱ्या चिमुरड्यांचे वास्तवही तितकेच वेदनादायी आहे. पाच ते दहा वर्षांची मुले-मुली रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दोरीवर चालणे, उंच काठीवर तोल सांभाळणे किंवा विविध धोकादायक कसरती करताना दिसतात. लोकांसमोर जीव धोक्यात घालून केलेल्या या कसरतींमधून मिळणाऱ्या काही रुपयांवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पोटाच्या खळगीसाठी बालपणाची झुंज देणारे हे चिमुरडे अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे वास्तव समोर आणतात. “एकीकडे सरकार ‌‘बेटी बचाओ, बेटी पढाओ‌’च्या घोषणा करते; पण दुसरीकडे लहान मुलगी पोटासाठी दोरीवर कसरती करून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहे. हे चित्र बदलायला हवे,” अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT