Dombivli MIDC Pipeline leak Pudhari
ठाणे

Dombivli MIDC Pipeline leak: डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांची सांडपाणी वाहिनी फुटली

उग्र दर्प पसरून प्रदूषण वाढल्याने रहिवाशांत संताप

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांची सांडपाणी वाहिनी फुटल्याने परिसरात उग्र दर्प पसरून प्रदूषण वाढल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.एमआयडीसीच्या निवासी विभागातील के. व्ही. पेंढारकर कॉलेज परिसरात असलेल्या रासायनिक कंपन्यांची सांडपाणी वाहून जाणारी वाहिनी गुरुवारी रात्री अचानक फुटली. परिणामी या वाहिनीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले होते. त्यामुळे परिसरात सर्वत्र रासायनिक दुर्गंधी पसरून प्रदूषण वाढले होते.

सदर सांडपाणी वाहिनी फुटल्याचे समजल्यावर एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी तातडीने पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सांडपाण्याचा प्रवाह खंडित करून दुरुस्तीचे काम सुरू केले. सदर सांडपाण्याची वाहिनी गटाराच्या कामामुळे फुटल्याचे सांगण्यात आले.

मात्र या वाहिनीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी बाहेर पडल्याने त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त उग्र दर्पाने परिसरातील रहिवाशांची झोपमोड तर झालीच शिवाय या दर्पाचा भयंकर त्रास जाणवू लागला होता. प्रामुख्याने लहान मुलांसह वयोवृद्ध रहिवाशांना त्रास सहन करावा लागला होता.

गुरुवारी निवासी भागात महानगर गॅसच्या वाहिनीसह महावितरणची भूमिगत केबल एमआयडीसी ठेकेदाराकडून गटाराच्या बांधकामावेळी जेसीबीचा धक्का लागून नादुरुस्त झाली होती. त्यामुळे कित्येक तास रहिवाशांना वीज आणि गॅसविना राहावे लागले होते.

मिलापनगर तलाव परिसरात गुरुवारी दुपारी अडीच वाजता खंडित झालेला विद्युत पुरवठा रात्री दीड वाजता अर्थात 11 तासानंतर सुरळीत करण्यात आला. ऐन उन्हाळ्यात अशी परिस्थिती होत असल्याने या भागातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

...अन्यथा उपोषण करणार

एमआयडीसी प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे, अशी या भागातील त्रस्त रहिवाशांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अशा बेजबादार ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच चुकीच्या पद्धतीने चाललेल्या गटारांची कामे योग्य तथा नियोजनबद्ध पद्धतीने करावी, अन्यथा प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसावे लागणार असल्याचा इशारा मिलापनगर परिसरातील रहिवासी असलेल्या विख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना दिला. डॉ. पाटे यांना पाठिंबा देण्याकरिता त्यांच्यासोबत आम्हीही उपोषणाला बसणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT