भिवंडी: भिवंडीतील नारपोली-गंगारामवाडी परिसरात १३ वर्षांची कोहिनूर अपार्टमेंट इमारत कोसळून १० निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याच्या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. इमारत मालक बिलाल अहमद अबुबकर खान आणि दुरुस्ती कंत्राटदार अशोक यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेच्या तक्रारीनुसार, बिलाल अहमद अबुबकर खान याने पालिका अथवा शासनाची आवश्यक परवानगी न घेता कोहिनूर अपार्टमेंटचे बांधकाम केले.
निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अवघ्या १३ वर्षांत इमारत धोकादायक आणि मोडकळीस आलेली असल्याचे पोलीस तपासात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पालिकेने धोकादायक इमारतीबाबत नोटिसा बजावूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. इमारत रहिवाशांसाठी जीवघेणी ठरू शकते, याची जाणीव असतानाही इमारत रिकामी करून घेण्यात आली नाही. त्यामुळे धोक्याच्या छायेतच नागरिक राहत होते.
गुरुवारी रात्री काही क्षणांतच संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. ढिगाऱ्याखाली निष्पाप जीव गाडले गेले आणि दहा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दुर्घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू असतानाच या घटनेला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर पालिकेच्या तक्रारीवरून मालक आणि कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे सहाय्यक आयुक्त फैसल तातली यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५(अ), १२५(ब), ३(५) तसेच एमआरटीपी अधिनियमातील कलम ५२ आणि ५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.