Crime News pudhari photo
ठाणे

Thane Crime : खोलीत रक्ताचा सडा; बहीण-भावाचा हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालायात या दोन्ही भावंडांवर तातडीने उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याणमधील महाराष्ट्र लॉजमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आल्याने स्टेशन परिसरात एकच खळबळ माजली आहे. या लॉजमधील एका रूमध्ये बहीण-भावाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिस पोहोचल्यामुळे या भावंडांचे प्राण वाचले आहेत. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालायात या दोन्ही भावंडांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रेल्वे स्टेशन समोर महाराष्ट्र लॉज आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास लॉजमधील एक कर्मचारी रूममध्ये गेला. त्याने पाहिले की, रूममध्ये थांबलेल्या महिला आणि पुरूषाच्या मनगटातून रक्त वाहत आहे. दोघेही बेशुद्ध स्थितीत पडलेले आढळून आले. कर्मचाऱ्याने याची माहिती मॅनेजरला दिली.

मॅनेजरने तातडीने महात्मा फुले चौक पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बलराम सिंग परदेशी आपल्या सहकाऱ्यांसह लॉजमध्ये दाखल झाले. दोघांना उपचारासाठी हॉस्पिटलला पाठविण्यात आले.

दोघे बेशुद्ध असल्याने, तसेच प्रकृतीला धोका वाढल्याने दोघांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालायाकडे हलविण्यात आले. दोघा भावंडांवर उपचार असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे भाऊ/बहीण आहेत.

बेरोजगारी...गरिबी...उपासमारीतून नैराश्य

गेल्या अनेक दिवसांपासून दोघांना काम/धंदा नाही. बेरोजगारी आणि गरीबीमुळे उपासमार होत असल्याने दोघांनी हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी २१ जुलै रोजी दोघे कल्याणच्या महाराष्ट्र लॉजमध्ये आले होते. सध्या दोघांवर उपचार सुरू असून पोलिसांकडून चौकस तपास करण्यात येत आहे. या भावंडांनी बेरोजगारीच्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला की, यामागे आणखी काही कारण असू शकते ? याचा उलगडा करण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT