ठाणे : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधक तसेच स्वबळाचा नारा देणारे वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर भाजप नेतृत्वाने ठाणे जिल्ह्यातील निवडणुकांची जबाबदारी सोपवून कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्याचा संदेश दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मुंबई वगळता राज्यात अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या जाऊ शकतात, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी दिलेले आहेत. त्याची प्रचिती नगरपालिका आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केली असल्याने ठाकरे-शिंदे यांच्या दोन शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या गुप्त बैठकांच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. तशीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यातील आहे.
भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण-डोम्बिवली महापालिकांवर कमळ फुलविण्याचा निर्धार करून त्यानुसार शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात भाजपचा महापौर बसविण्याचा एल्गार करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्यात सुरुवात केली. जोडीला आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीकास्त्र सोडत अनेक घोटाळे बाहेर काढले.
योजनांमधील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार उघडकीस आणून प्रशासनाच्या आडून शिवसेनेला धारेवर धरण्याचे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकांची जबाबदारी मंत्री गणेश नाईक यांच्यावर भाजपने सोपविलेली आहे.
ठाणे, ठाणे ग्रामीण, भिवंडी, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर या महापालिकांचे निवडणूक प्रभारी म्हणून गणेश नाईक हे निर्णय घेणार आहेत. तर निवडणूक प्रमुख म्हणून आमदार संजय केळकर हे ठाणे महापालिकेची तर माजी खासदार संजीव नाईक हे नवी मुंबई महापालिकेची जबाबदारी सांभाळणार आहेत.
निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी
महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये भाजपने निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखांची घोषणा करून निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ज्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, ते बहुतेक नेते हे स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याच्या मतांचे आहेत. यावरून ठाणे जिल्ह्यात भाजपचा स्वबळाचा नारा बुलंद होऊ शकतो, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होऊ लागला आहे.
कपिल पाटील यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी
कल्याण महापालिकेची जबाबदारी ही भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यावर न सोपविता युवा नेते नाना सूर्यवंशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे ठाणे ग्रामीण तर आमदार महेश चौघुले यांच्यावर भिवंडी महापालिकेचे निवडणूक प्रमुख काम पाहणार आहेत. कपिल पाटील यांच्यावर जिल्हा परिषद आणि दोन नगरपालिकांच्या जबाबदारी असणार आहे. मीरा-भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता तर उल्हासनगरमध्ये प्रदीप रामचंदानी यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे.