मिरा-भाईंदरच्या महापौरपदासाठी भाजपचेच वर्चस्व  pudhari photo
ठाणे

Mira Bhayandar mayor BJP : मिरा-भाईंदरच्या महापौरपदासाठी भाजपचेच वर्चस्व

भाजपच्या डिंपल मेहता तर काँग्रेस-सेना विकास आघाडीच्या रुबिना शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल; उपमहापौरपदासाठी भाजपचे ध्रुवकिशोर पाटील तर आघाडीकडून वंदना पाटील यांचा उमेदवारी अर्ज

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका महापौर पदासाठी भाजपकडून डिंपल मेहता व काँग्रेस-शिंदे शिवसेना या मिरा-भाईंदर विकास आघाडीतील काँग्रेसच्या रुबिना शेख यांनी तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील तर आघाडीतील शिवसेनेच्या वंदना विकास पाटील यांनी शुक्रवारी नगरसचिव दिनेश कानगुडे यांच्याकडे अर्ज दाखल केला.

यातील भाजपच्या मेहता व पाटील या उमेदवारांनी प्रत्येकी दोन तर शेख व वंदना या आघाडीच्या उमेदवारांनी प्रत्येकी एक असे एकूण 6 उमेदवारी अर्ज दाखल केले. यंदाचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्याप्रमाणे संभाव्य सत्ताधारी व विरोधकांनी या पदासाठी नवनिर्वाचित महिला सदस्यांचा उमेदवारी अर्ज महापौर पदासाठी दाखल केला आहे.

महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 3 फेब्रुवारी रोजी पिठासीन अधिकारी तथा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार असून त्याची प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरु करण्यात येणार आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपने एकूण 95 पैकी तब्बल 78 जागांवर विजय प्राप्त केल्याने आपसूकच पालिकेत भाजपची एक हाती सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेस व शिंदे शिवसेनेला अनुक्रमे 13 व 3 जागा जिंकता आल्याने हे दोन्ही पक्ष मिरा-भाईंदर विकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी बाकावर एकत्र बसणार आहेत.

महापौर पदावर घराणेशाही जिंकणार असल्याचा अंदाज दैनिक पुढारीने 23 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात व्यक्त केला होता. तो खरा ठरला असून भाजपचे स्थानिक नेतृत्व आ. नरेंद्र मेहता यांनी आपल्या वहिनी तथा माजी महापौर डिंपल मेहता यांना पुन्हा महापौर पदासाठी संधी दिली आहे. गतवेळी सुद्धा डिंपल यांची महापौर पदावर वर्णी लावण्यात आली होती. यंदा त्यांना पुनर्संधी दिल्याने यंदाचा महापौर मराठी भाषिकच हवा, या मराठी एकीकरण समितीच्या मागणीला छेद मिळाला आहे.

मात्र आ. नरेंद्र मेहता यांनी उपमहापौरपदी ज्येष्ठ नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील या मराठी भाषिक सदस्यांना उमेदवारी देऊन मराठी भाषिकांच्या मुद्द्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महापौर मराठीच असावा, हा मुद्दा तूर्तास गौण ठरल्याचे दिसून आले आहे. तर मराठी महापौरांच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीने रक्त सांडण्याची टोकाची भूमिका घेतली होती. त्यावर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी रक्त सोडणारे मराठी नसावेत, असा सावध पावित्रा घेत महापौर मराठीच असावा, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली आहे. मात्र महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आल्याने तूर्तास मराठीचा मुद्दा मागे पडल्याची चर्चा आहे.

भाजपच्या उमेदवारांचा विजय बहुमताच्या जोरावर

येत्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही पदांची निवडणूक पार पडणार असून त्यात भाजपच्याच उमेदवारांचा विजय बहुमताच्या जोरावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करतेवेळी भाजपचे आ. नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जुबेर इनामदार यांच्यासह सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT