Birthday Cake file photo
ठाणे

Birthday Cake: वाढदिवसाचा केक ठरला जीवघेणा! ३ वर्षीय मुलाने गिळल्या सजावटीतील दोन धातूच्या पिना, ठाण्यातील धक्कादायक घटना

Thane News: वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी आणलेल्या केकमुळे ठाण्यातील एका चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

Thane News Birthday Bowling Alley Cake

मुंबई: वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी आणलेल्या केकमुळे ठाण्यातील एका चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. तीन वर्षीय रेयांशने वाढदिवसाच्या केकवरील सजावटीत लपवून ठेवलेल्या दोन धातूच्या पिना नकळत गिळल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. सुदैवाने या पिना ४८ तासांनंतर नैसर्गिकरीत्या शरीराबाहेर पडल्या आणि मोठा अनर्थ टळला.

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणाऱ्या जीवशास्त्र शिक्षिका स्नेहा शेलार यांनी हा धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे. त्यांनी सांगितले की, ३१ मे रोजी त्यांचा मुलगा रेयांशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी 'बॉलिंग ॲली' आकाराचा केक मागवण्यात आला होता.

“सजावट, केक आणि कुटुंबीयांसोबतचा आनंदाचा क्षण... सर्व काही स्वप्नवत वाटत होते. मात्र दुसऱ्याच दिवशी, रेयांशच्या वाढदिवशी आम्हाला रुग्णालयात जाव लागलं,” असे स्नेहा शेलार यांनी सांगितले. शेलार यांच्या आरोपानुसार, ठाण्यातील एका बेकरीने केकवरील चॉकलेट बॉलिंग पिन्स उभ्या राहाव्यात यासाठी त्यांच्या आत धातूच्या तारांचा वापर केला होता. विशेष म्हणजे हा केक लहान मुलांसाठी असल्याची माहिती बेकरीला देण्यात आली होती, तरीही याबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती.

पार्टीतील काही मोठ्या मुलांना सजावटीच्या चॉकलेटमध्ये धातूच्या रॉड्स आढळल्या. त्यांनी याबाबत पालकांना माहिती दिल्यानंतर रेयांशनेही अशा पिना गिळल्या असाव्यात, अशी भीती कुटुंबाला वाटली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाला तातडीने एक्स-रेसाठी रूग्णालयात नेण्यात आले. तपासणीत त्याच्या लहान आतड्यात दोन धातूच्या पिना अडकल्या असल्याचे दिसून आले.

रेयांशवर उपचार करणाऱ्या ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया टाळण्याचा सल्ला दिला. कारण पिना आधीच आतड्यांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे त्या नैसर्गिकरीत्या शरीराबाहेर पडण्याची प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले.

“माझा मुलगा आता सुरक्षित आहे. दोन्ही धातूच्या तारा ४८ तासांनंतर नैसर्गिकरीत्या बाहेर पडल्या. पण ते ४८ तास माझ्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक क्षण होते,” असे शेलार यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

पालकांनी घ्यावी विशेष काळजी

या घटनेनंतर शेलार यांनी पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. केक किंवा खाद्य सजावटीमध्ये धातूचे तुकडे किंवा इतर साहित्य वापरण्यात आले आहे का, तसेच सजावटीचे सर्व भाग खाण्यायोग्य आहेत का, याची खात्री करून घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.

ग्राहकांना भरपाई मिळू शकते

या प्रकरणी कुटुंबाने कासारवडवली पोलिसांकडे धाव घेतली. मात्र हा विषय अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे, केक किंवा चॉकलेट पिनचा नमुना नसल्यामुळे चौकशी करणे कठीण असल्याचे FDA अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र ग्राहक परिषदेचे शिरीष देशपांडे यांनी सांगितले की, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत दोषपूर्ण उत्पादनांमुळे किंवा आवश्यक इशारे न दिल्यामुळे झालेल्या हानीसाठी उत्पादक आणि विक्रेते जबाबदार धरले जाऊ शकतात. या कायद्यात केवळ शारीरिक इजाच नव्हे, तर मानसिक त्रासाचाही समावेश आहे. त्यामुळे प्रभावित कुटुंब ग्राहक न्यायालयात भरपाईची मागणी करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT