भिवंडीत साडेपाच लाखांची पाणीचोरी उघड image source Meta AI
ठाणे

Bhiwandi water theft : भिवंडीत साडेपाच लाखांची पाणीचोरी उघड

पाणीचोरीविरोधात दोन कारवाया

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडीत पाणीचोरी विरोधात करण्यात आलेल्या दोन ठिकाणच्या कारवाईत साडे पाच लाखांची पाणीचोरी उघडकीस आली आहे. भिवंडीतील अनेक भागात पाणी वितरण अनियमित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असताना शहरात पाणी चोरी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश पालिका महापौर नारायण चौधरी व आयुक्त अनमोल सागर यांनी दिल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता सरफराज अन्सारी यांचे नेतृत्वाखाली पथक प्रमुख विराज भोईर, सहाय्यक पथक प्रमुख नफीस मोमीन, रत्नदीप भालेराव, कनिष्ठ अभियंता अरफात खान यांच्या पथकाने एका सर्व्हिस सेंटर व पाणी संकलित करून विक्री करणाऱ्यावर कारवाई करत साडे पाच लाखांची पाणीचोरी उघडकीस आणली आहे.

नाशिक रोडवरील अवचित पाडा येथे शेख मेराज यांनी आपल्या सर्व्हिस सेंटरमध्ये महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवागनी न घेता पालिकेच्या जलवाहिनीला छिद्र पाडून अर्धा इंच व्यासाची एक नळ जोडणी करून सदर ठिकाणी सर्विस सेंटर चालवून भिवंडी पालिकेचे 99 हजार 400 रुपयांची पाणी चोरी करून पालिकेचे नुकसान केले. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेमध्ये मौजे नारपोली येथील चौथाणी कंपाऊंड येथे मुन्नवर यांनी मनपाची कोणतीही पूर्व परवागनी न घेता पालिकेच्या पाईपलाईनला छिद्र पाडून एक इंच व्यासाचे दोन नळ अनधिकृत जोडणी घेऊ न चौथानी कंपाऊंड येथील एका गाळ्यामध्ये 5000 लिटर क्षमतेच्या सात नग पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून मिनीडोअर मधील पाण्याच्या टाकीमधून हॉटेल, डाईंग व सायझिंगला पाणी पुरवीत असल्याचे दिसून आले.

सदर ठिकाणाहून 5 हजार लिटर क्षमतेच्या 7 नग पाण्याच्या टाक्या, 3 मोटर, 1 सबमर्शीबल पंप जप्त करून 4 लाख 68 हजार रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यामध्ये मुन्नवर विरोधात पाणी- चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पालिका प्रशासनाने पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने पाणीचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT