Bhiwandi Toll collection started court order suspended again
भिवंडी : पुढारी वृत्तसेवा
भिवंडी तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. ज्याचा फटका वाहनचालकांसह स्थानिक चाकरमानी प्रवासी विद्यार्थी यांना बसत आहे.
मानकोली अंजूरफाटा खारबाव ते चिचोटी या राज्यमार्गाची दुरवस्था झाल्याने, टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी ठेकेदार कडून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घेत येथील टोल वसुली बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी कंपनीने शंभर दिवसात रस्ते दुरुस्ती करून त्यादरम्यान टोल वसुली सुरू ठेवण्यासाठी मागणी केली.
उच्च न्यायालयाच्या परवानगीने त्यास मान्यता दिल्यानंतर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा रस्ते दुरुस्ती कामास सुरवात केली. पण शंभर दिवसात रस्ते दुरुस्ती न झाल्याने पुन्हा एकदा या मार्गावरील टोल वसुली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे भरणार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत असल्याने या पावसाळ्यात येथील ग्रामस्थांसह वाहन चालकांना खड्डयातूनच प्रवास करावा लागणार अशी परिस्थिती आहे.
या रस्त्याच्या निगा दुरुस्ती राखत टोल वसुलीचा ठेका घेणाऱ्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कधीच गांभीयनि बघितले नाही. त्यामुळे कंपनीला काळ्या यादीत टाकून टोल वसुली बंद केली. पण कंपनीने न्यायालयात धाव घेत शंभर दिवसांची मुदत मिळवत रस्ते दुरुस्तीची हमी दिली पण त्या शंभर दिवसात ही यांनी रस्ते दुरुस्ती केली नाही. ज्यामुळे येथील ग्रामस्थ व वाहनचालकांचा पुन्हा खड्ड्यातून प्रवास सुरू झाला आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थ संघर्ष समितीचे ज्ञानेश्वर मुकादम यांनी दिली आहे.
स्थानिक आमदारांना रस्त्यावर उतरून खड्डे भरायची वेळ आली आहे. तालुक्यातील सर्व रस्त्यांची भयानक परिस्थिती झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा ठेकेदारांवर कधी ठोस कारवाई करीत नाही. मागील बारा वर्षांपासून सुरू असलेला हा संघर्ष आम्हाला करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थ संघर्ष समितीचे ज्ञानेश्वर मुकादम यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या समस्या सुटणार तरी कधी असा सवाल उपस्थीत होत आहे.