Bhiwandi traffic congestion pudhari photo
ठाणे

Bhiwandi traffic congestion : गोडाऊन आले; रस्ते मात्र ‘जैसे थे’!

सावद नाका झाला कोंडीचा हॉटस्पॉट; कंटेनरच्या विळख्यात ग्रामस्थांचा जीव मुठीत

पुढारी वृत्तसेवा

सापाड : योगेश गोडे

भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात गोडाऊनची संख्या झपाट्याने वाढली; मात्र त्या तुलनेत रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत कोणतीही ठोस सुधारणा झाली नसल्याने सावद नाका सध्या वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट बनला आहे. २४ ते ४८ फुटांपर्यंत लांबीचे कंटेनर रस्त्यावरून धावत असून, नाक्यावर वळताना होणाऱ्या अडथळ्यामुळे चारही बाजूंची वाहतूक ठप्प होत आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने कामगार, विद्यार्थी, रिक्षाचालक, दुचाकीस्वार आणि ग्रामस्थ अक्षरशः कोंडीच्या विळख्यात अडकले आहेत.

सावद नाक्यावर पडघा, सापे, येवई आणि पिसे मार्गाने येणारी वाहतूक एकत्र येते. त्यात गोडाऊनमध्ये माल आणण्यासाठी आणि बाहेर पाठविण्यासाठी येणाऱ्या अवजड कंटेनरची भर पडत आहे. मोठ्या कंटेनरला वळण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने एखादे वाहन अडले की त्याचा परिणाम काही मिनिटांत चारही दिशांच्या वाहतुकीवर होतो. कंटेनरच्या बाजूने मार्ग काढताना दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना जीव धोक्यात घालावा लागतो. अवजड वाहनांच्या कोंडीत हलक्या वाहनांचा अक्षरशः श्वास कोंडला आहे.

या परिसरात नुकतेच कंटेनरच्या धडकेत एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यात संबंधित वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत ग्रामस्थांच्या मनातील भीती आणखी वाढली आहे.

दररोजच्या कोंडीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेकदा स्थानिक नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागते. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी प्रशासनाची असताना ग्रामस्थांवरच ती वेळ का येते, असा सवाल उपस्थित होत आहे.

सावद गावचे माजी सरपंच रामदास दळवी यांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे. दररोज वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही सावाद नाक्यावर उभे राहून प्रयत्न करतो. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

गोडाऊन वाढले; नियोजन कुठे?

  • भिवंडी-पडघा परिसरात गोडाऊन झोन झपाट्याने विस्तारला. रोजगार आणि व्यवसायाच्या संधी वाढल्या, मात्र त्याच वेगाने रस्त्यांची क्षमता वाढली नाही. गोडाऊन उभारण्यापूर्वी अवजड वाहनांची संख्या, प्रवेश-निर्गमन मार्ग, पार्किंग आणि स्थानिक वाहतुकीवरील परिणाम यांचा विचार होणे अपेक्षित होते. मात्र आता गोडाऊनमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांचा भार थेट गावांच्या रस्त्यांवर पडत आहे.

  • त्यामुळे प्रश्न केवळ सावाद नाक्यावरील कोंडीचा राहिलेला नाही. गोडाऊनचा विस्तार नियोजनाशिवाय झाला असेल, तर त्याचा फटका स्थानिकांच्या दैनंदिन जीवनाला का बसावा? रुग्णवाहिका, शाळकरी विद्यार्थी, कामगार आणि अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोंडीत अडकावे लागत आहे.

रस्ते कोंडीत, नागरिकांना धोक्यात ठेवणे कितपत योग्य?

गोडाऊनचा विकास थांबविण्याचा प्रश्न नाही; मात्र विकासाच्या नावाखाली गावांचे रस्ते कोंडीत आणि नागरिकांना धोक्यात ठेवणे कितपत योग्य? सावाद नाक्यावर दररोज निर्माण होणारी कोंडी आता काही मिनिटांच्या विलंबापुरती राहिलेली नसून ती नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनली आहे. त्यामुळे प्रशासन सावाद नाक्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी वाहतूक आराखडा तयार करणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

गोडाऊनमुळे विकास होत असेल; पण त्या विकासाची किंमत स्थानिकांच्या जीवावर मोजावी लागणार असेल तर असा विकास कोणाच्या उपयोगाचा? सावद नाक्यावर दररोज कंटेनरच्या रांगा लागतात. बापगाव, सावद, इताडे आणि सापे नाकेही कोंडीची केंद्रे बनली आहेत. मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुरेसे वाहतूक पोलीस दिसत नाहीत. ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
शांताराम म्हात्रे, ग्रामस्थ, सावद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT