Public Hall Misuse pudhari photo
ठाणे

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडीत पालिकेचे सार्वजनिक सभागृह खासगी व्यक्तीच्या ताब्यात

आयुक्तांच्या झाडाझडतीमध्ये प्रकार उघडकीस; गुन्हा दाखल करण्‍याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : संजय भोईर

भिवंडीत महानगरपालिकेचे सार्वजनिक सभागृह खासगी व्यक्तीच्या ताब्यात असल्याचे भिवंडी आयुक्तांच्या झाडाझडतीमध्‍ये उघडकीस आले आहे. सदरची व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून मनपाच्या मालकीची मालमत्ता अनाधिकाराने वापरत असून, महानगरपालिकेचा महसूल बुडविल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी तातडीने सदर सभागृहाची चावी ताब्यात घेऊन संबंधित व्‍यक्तीच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

भिवंडी महानगरपालिकेच्या मिळकती या वापराविना पडून असून अनेक ठिकाणी त्यांची निगा पालिका प्रशासनाकडून ठेवली जात असल्याचे अनेक तक्रारी आल्यानंतर नुकताच पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी मंगळवारी अचानक भिवंडी शहरातील सहयोग नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सोनादेवी सभागृह भादवड येथे भेट दिली.

यावेळी प्रभाग क्र. १४ येथील सहयोग नगर आरोग्य केंद्राच्या बाजूला असलेल्या देविदास गुळवी सभागृहाची आयुक्त अनमोल सागर यांनी अचानक पाहणी केली असता, या पाहणी दरम्यान पालिकेच्या मालकीच्या देविदास गुळवी सभागृहाची चावी परिसरातील एका खासगी व्यक्तीच्या ताब्यात असल्याचे आढळून आले.

पालिकेच्या मालमत्तांंचे रक्षण करणार : आयुक्त

पालिकेच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करून सर्व मालमत्तांबाबत विभागाकडून माहिती घेण्यात येत असून, पालिका सार्वजनिक मालमत्ताचे रक्षण करणे ही पालिकेची जबाबदारी असल्याचे आयुक्तांनी स्पष्‍ट केले. महानगरपालिकेची मालमत्ता कोणत्याही खासगी व्यक्तीस अनधिकाराने वापर करता येणार नाही. सदरच्या मालमत्तेचा उपयोग शहरातील सामान्य नागरिकांसाठीच होणे आवश्यक आहे. तसेच या अनधिकृत वापरामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. या गंभीर बाबीची दखल पालिका प्रशासन कठोरपणे घेईल, असा इशारा आयुक्त अनमोल सागर यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT