

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंब्रा, दिवा आणि कळवा परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या तिन्ही परिसरांतील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा सलग २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा आणि कळवा प्रभाग समितीमधील बहुतांश भागांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाळ्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला असून, ऑक्टोबर महिन्यापासूनच मान्सूनने माघार घेतल्याने जलसाठ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयानुसार १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदचा सर्वाधिक परिणाम मुंब्रा, दिवा आणि कळवा परिसरातील नागरिकांवर होणार आहे. दिवा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांसह मुंब्रा प्रभाग समितीतील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र, मुंब्रा प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील काही भागांना या बंदमधून वगळण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, शुक्रवारी दुपारी १२ वाजता पाणीपुरवठा पूर्ववत झाल्या नंतरही नागरिकांना तातडीने नियमित दाबाने पाणी मिळणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता असून, या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नागरिकांना दोन ते तीन दिवस पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
पाण्याचा काटकसरीने वापर हवा...
आधीच अनियमित आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असलेल्या या परिसरातील नागरिकांना या निर्णयामुळे अतिरिक्त अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.