भिवंडी : संजय भोईर
शहरात घराणेशाही जोरात असल्याचे चित्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिसले. भाजप आमदार महेश चौघुले यांनी त्यांचा मुलगा मित चौघुले याला प्रभाग 1 मधून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर केली आहे.
तर माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे माजी नगरसेवक सुमित पाटील यांनी प्रभाग 17 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदेसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा भाऊ माजी नगरसेवक संजय म्हात्रे यांनी प्रभाग प्रभाग 13 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आमदार खासदारांसह शहरातील माजी नगरसेवकांनी देखील आपल्या कुटुंबातील उमेदवारांना नेहमीप्रमाणे आपल्या प्रभागात उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतली आहे. शिंदे सेनेचे माजी उपमहापौर मनोज काटेकर व त्यांच्या पत्नी प्रभाग 21 मधून निवडणूक लढत आहेत. तर शिंदे सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांनी प्रभाग 13 मधून तर त्यांचा मुलगा रोहित चौधरी यांनी प्रभाग 15 मधून उमेदवारी मिळवली आहे.
एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले शिंदेसेनेचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक मदनबुवा नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका गुलाबताई मदन नाईक व सून अस्मिता प्रभुदास नाईक असे एकाच कुटुंबातील तिघेजण नगरसेवक होते. पण यावेळी शिंदे सेनेने फक्त गुलाबताई मदन नाईक यांना उमेदवारी देत मदनबुवा व त्यांच्या सून अस्मिता यांना उमेदवारी नाकारली आहे. मदनबुवा हे मागील 40 वर्षांपासून पालिका सभागृहात आहेत. परंतु यावेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.