Bhiwandi Civic Politics pudhari photo
ठाणे

Bhiwandi Civic Politics : स्वीकृत सदस्यांच्या निवडीने भिवंडीत राजकीय रणकंदन

काँग्रेसचा पालिकेसमोर शड्डू; नऊ स्वीकृत सदस्यांची वर्णी

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : संजय भोईर

भिवंडी महानगरपालिकेच्या विशेष महासभेत गुरुवारी महापौर नारायण चौधरी यांनी नऊ स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. काँग्रेसकडून इम्रान मोहम्मद एच. अन्सारी, अरफात ए. शेख आणि सलीम अहमद शेख, भाजपकडून सुगंधा टावरे आणि रवी सावंत, शिवसेनेकडून संजय काबुकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून गिरीश म्हात्रे, समाजवादी पक्षाकडून भरत जंगलानी आणि कोणार्क विकास आघाडीकडून मयूर विलास पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर संबंधित पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला.

भाजपसोबत सुरुवातीपासून एकनिष्ठ राहिल्याचे फळ पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेल्या संधीच्या रूपाने मिळाले आहे. पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचा विश्वास भाजपच्या स्वीकृत सदस्या सुगंधा टावरे यांनी व्यक्त केला. पक्षातर्फे अनेकदा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. यावेळी स्वीकृत सदस्य म्हणून मिळालेली संधी ही पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली कौतुकाची थाप असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे स्वीकृत सदस्य संजय काबुकर यांनी दिली.

भाजप नेहमीच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष रवी सावंत तसेच पक्षाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्या सुगंधा टावरे यांना संधी दिली आहे. अडीच वर्षांनंतर पुन्हा अन्य दोन कार्यकर्त्यांना पक्ष संधी देईल, असा विश्वास भाजप गटनेते संतोष शेट्टी यांनी व्यक्त केला.

शिवसेना घोडेबाजार करीत नाही; निष्ठेला साथ देते : मनोज काटेकर

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात, हे संजय काबुकर यांच्या निवडीवरून स्पष्ट झाले आहे. इतर पक्षांप्रमाणे शिवसेनेत घोडेबाजार होत नाही आणि झालाही नाही. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख हे दोन्ही पक्ष भाड्याने चालवत असल्याचा आरोप करत, शिवसेनेत असा प्रकार पाहायला मिळणार नाही, असा विश्वास शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून निदर्शने

काँग्रेस गटनेत्याने पक्षाबाहेरील व्यक्तींची स्वीकृत सदस्यपदासाठी शिफारस केल्याचा आरोप करत माजी खासदार सुरेश टावरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शहराध्यक्ष आबिद खान, तारिक फारूखी, राणी अग्रवाल, रुकसाना कुरेशी आणि आर्शी आजमी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी गटनेत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भिवंडी शहरात तीन वेगवेगळ्या पक्षांतील खासदार आणि आमदार एकत्र येऊन पालिकेचे सत्ताकारण चालवत आहेत. हे शहराच्या विकासासाठी एकत्र आले असते, तर आनंद झाला असता; मात्र शहराला विकण्याच्या वाईट हेतूने ते एकत्र आल्याचा आरोप सुरेश टावरे यांनी केला. समाजवादी पक्षातून हाकलून दिलेले आमदार रईस शेख भिवंडीत काँग्रेस पक्ष चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाच्या नेतृत्वाकडून त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नसल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. शहरात काँग्रेस पक्षाला प्रत्येक वेळी विकले जात असल्याचा आरोपही सुरेश टावरे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT