भिवंडी महानगरपालिका / Bhiwandi Municipal Corporation Pudhari News Network
ठाणे

Bhiwandi municipal politics : भिवंडी पालिकेत भाजपचा एक गट काँग्रेसच्या गळाला

महापौर निवडणुकीला वेगळे वळण; आमच्यावर खापर का फोडता ? : शिवसेना संतप्त

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : संजय भोईर

भिवंडी महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौर पदाची उमेदवारी जाहीर केलेले नारायण चौधरी यांनी भाजपातील एक गट व शिवसेना पक्ष सहकार्य करीत नसल्याचे कारण देत व शहराध्यक्ष रवी सावंत यांनी अचानक महापौर पदासाठी स्नेहा मेहुल पाटील यांचे नावे पत्र दिल्याने व्यथित होऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प. ) पक्षाच्या सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

यावेळी त्यांनी केलेल्या आरोपाचे शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी खंडन केले असून भाजपामध्ये दोन गट पडले व त्यामुळे भाजपा उमेदवार पळून गेले त्याचे खापर आमच्यावर का फोडता असा सवाल शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी केला आहे.

भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी यांनी शिवसेना पक्षावर केलेला आरोप चुकीचा व निराधार आहे. भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 अशा 34 नगरसेवकांची एकत्र बैठक झाली त्यावेळेस आपण एकत्र कॅम्प लावू असे ठरले होते. परंतु त्यानंतर भाजपामध्येच दोन गट पडले. त्यामुळे एक गट भाजपाच्या कॅम्पमध्ये गेलाच नाही. त्यानंतर आम्ही भिवंडी शहरातच राहिलो आहोत.

शिवसेनेकडून तीन दिवसापूर्वी कॅम्प लावला त्यामध्ये शिवसेनेचे सर्व नगरसेवक आम्ही एकत्र आहोत. त्यानंतर आम्ही भाजपाचे गटनेते संतोष शेट्टी यांच्याशी सतत संपर्कात होतो.त्यांचे नगरसेवक एकत्र आले नाही त्याचा दोष आमच्यावर लावणे चुकीचे आहे, असे मनोज काटेकर म्हणाले.

भाजपाच्या नगरसेवकाने सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याचा निर्णय चुकीचा आणि भिवंडी शहराच्या विकासाला बाधा आणणारा आहे. शिवसेना पक्ष ज्यांना शब्द देतो ते पूर्ण करतो हा भिवंडी शहराचा इतिहास आहे. अशा परिस्थिती मध्ये महापौर पदाचा उमेदवार पळून जात असेल तर ते दुर्दैवी आहे. महापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच ही प्रक्रिया सुरू झाली.

काँग्रेसचे 30 नगरसेवक असताना तारिक मोमिन यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली. यामध्ये काही तरी काळेबेरे आहे असे सांगत, पक्षातील वरिष्ठांचे पाठबळ असू शकते अशी टीका मनोज काटेकर यांनी केली आहे.पण उमेदवार निवडणुकीच्या दिवशी 20 फेब्रुवारी रोजी ठरवायचा आहे.त्यांना अगोदरच शंका का वाटली त्यामुळे ते अगोदरच का पळून गेले असा सवाल मनोज काटेकर यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT