संजय भोईर
भिवंडी: भिवंडी महापालिकेतील नऊ स्वीकृत नगरसेवक पदांसाठी तब्बल ३७ अर्ज दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चुरस वाढली आहे. विशेषतः काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील इच्छुकांच्या उमेदवारीवरून सुरू असलेला वाद आता उघडपणे समोर आला आहे. १६ ते २८ सप्टेंबरदरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत होती.
महापालिकेतील संख्याबळानुसार काँग्रेसला तीन, भाजपला दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना शिंदे गट, समाजवादी पक्ष आणि कोणार्क विकास आघाडीला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य मिळणार आहे.
भाजपने शहराध्यक्ष रवी सावंत व सुगंधा टावरे, शिवसेना शिंदे गटाने संजय काबुकर, तर कोणार्क विकास आघाडीने मयूर विलास पाटील यांची शिफारस केली आहे. याशिवाय अरुण आर. पाटील, गिरीश म्हात्रे, साजिद खान, माज अन्सारी, सरफराज (बाबू) खान, राणी अग्रवाल, मुख्तार खान, विकास पाटील, डॉ. आसिफ फारुकी, डॉ. कादिर सय्यद, ॲड. अब्दुल करीम सिद्दिकी, अब्दुल कलाम अशरफी, सोहेब अन्सारी, कुमार फडतरे, हाशिम खान आणि प्रथमेश शिंदे यांच्यासह अन्य इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
मात्र, अर्जदारांची अधिकृत यादी पालिका प्रशासनाने अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अंतिम निवडीपूर्वी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवकांच्या नऊ जागांसाठी ३७ अर्ज दाखल झाल्याने आता कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. पक्षीय संख्याबळानुसार जागांचे वाटप निश्चित असले तरी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर योग्य उमेदवारांची निवड करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
विशेषतः काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील इच्छुकांमुळे निवडीची प्रक्रिया अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. अंतिम निवडीकडे भिवंडीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.