Bhiwandi Kohinoor Building Collapse Pudhari
ठाणे

Bhiwandi Building Collapse: कोसळलेली इमारत धोकादायक, आधी आवाज आला अन् 3 तासात इमारत कोसळली

Bhiwandi Kohinoor Building Collapse: भिवंडीतील नारपोली परिसरातील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या कोहिनूर इमारतीचा बी-विंग मध्यरात्री कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Bhiwandi Kohinoor Building Collapse: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात गुरुवारी (30 जुलै) मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडी परिसरातील चार मजली 'कोहिनूर' इमारतीचा बी-विंग अचानक कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून, मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख पटली आहे. उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. NDRF, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

धोकादायक घोषित केली होती इमारत

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने या इमारतीला यापूर्वीच धोकादायक (C-Category) घोषित केले होते. त्यामुळे ती रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, इमारतीची डागडुजी सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, रात्री 11 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या बी-विंगचा काही भाग अचानक कोसळला.

दुर्घटनेआधी येत होते विचित्र आवाज

या चार मजली इमारतीत एकूण 48 खोल्या होत्या. प्रत्येक मजल्यावर 12 खोल्या होत्या. स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्री 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान इमारतीतून "कर... कर... कट... कट..." असे मोठे आवाज येऊ लागले. त्यामुळे नागरिकांनी संभाव्य धोका ओळखत काही कुटुंबांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली. मात्र, काही रहिवासी आणि कामगार बाहेर पडत असतानाच इमारतीचा बी-विंग क्षणार्धात कोसळला, त्यामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले.

प्राथमिक माहितीनुसार 7 ते 8 जण अडकले होते

दुर्घटनेनंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 7 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

  • शामजी पाल (वय 46)

  • संतोष पांडे उर्फ मुन्ना (वय 42)

  • मिराज शेख (वय 35)

याशिवाय काही मजूरही अडकल्याची माहिती मिळाली असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

सकाळपर्यंत ८ मृतदेह बाहेर काढले

भिवंडी इमारत दुर्घटनेतील आठ व्यक्तींचे मृतदेह सकाळी ९:३० पर्यंत आय.जी.एम हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत.

१) शमीम शेख वय 32

२) रंजीत सिंग वय 45

३) ओळख पटलेली नाही.

४) मिराज रसूल शेख वय 34

५) संतोष कुमार पांडे वय 42

( नातेवाईक - अंकित पांडे 9511795611)

६) शमीम अन्सारी वय 30

( नातेवाईक -शाहिद अन्सारी 9175169964)

७) ओळख पटलेली नाही.

८) मृतदेह आता मिळाला आहे.

युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच NDRF, भिवंडी अग्निशमन दल, श्वानपथक, भोईवाडा पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी तसेच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यासाठी घटनास्थळी दोन रुग्णवाहिका आणि एक जेसीबी मशीन तैनात करण्यात आली असून, ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

स्थानिक नागरिकांचीही मदत

या बचाव मोहिमेत स्थानिक नागरिकांनीही मोठी मदत केली. दुर्घटना होण्यापूर्वी आवाज ऐकून अनेक कुटुंबांना बाहेर काढण्यात स्थानिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनास्थळी माजी नगरसेवक भगवान टावरे, मंडळ अधिकारी श्री. भोजणे, पोलीस अधिकारी आणि विविध यंत्रणांचे कर्मचारी उपस्थित असून संपूर्ण परिसरात बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

प्रशासन सतर्क

दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून प्रशासनाकडून बचावकार्याबरोबरच दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. धोकादायक इमारतींमध्ये सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांबाबतही आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या दुर्घटनेनंतर अशा इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT