भिवंडी : भिवंडी शहरात एका घरासह एका गोदामात अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये साडे चार लाखांचा मुद्देमाल चोरीची घटना घडली आहे. यामध्ये सोने चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. शहरातील वाणी आळी बाजारपेठ येथील जगदीश चंद्रकांत कोंडलेकर यांच्या घरात 16 डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात शिरून घरातील 3 लाख 99 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केले आहेत.
या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घरफोडीची घटना नारपोली पोलीस ठाणे गोदाम हद्दीत झाली आहे. तालुक्यातील अंजूर दिवे गावाच्या हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलातील कोहीनुर टेलीव्हीडीओ प्रा. लि. चे गोदामात 16 डिसेंबरच्या मध्यरात्री चोरट्याने गोदामांची भिंत व शटर तोडून गोदामातील 64 हजार 309 रुपये किमतीचे दोन होम थिएटर चोरी केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी कोहीनूर टेलीव्हीडीओ प्रा. लि. चे व्यवस्थापक आनंद जयवंत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.