भिवंडी: भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात धोकादायक इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीचा कोसळलेला भाग आणि त्याचा ढिगारा शेजारी असलेल्या दोन घरांच्या पत्र्यांवर पडला. पत्रे फुटून ढिगारा थेट घरात झोपलेल्या नागरिकांच्या अंगावर कोसळल्याने एका महिलेसह तीन मुलं जखमी झाली आहेत.
अबिदा मोमीन (वय ५५), खालिद मोमीन (वय १२), उमैरा अन्सारी (वय ६) आणि रैय्यान अन्सारी (वय १२) अशी जखमींची नावे आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत चौघांच्या डोक्याला, हातापायांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गौरीपाड्यातील या दुर्घटनेनंतर भिवंडी महापालिकेच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोहिनूर इमारत दुर्घटनेत तब्बल १० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.
इमारत धोकादायक असताना ती वेळेत पाडण्याची किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही का? एखाद्या नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.