

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या इंदिरा नगर/त्रिमूर्ती नगर झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री अचानक पोलिसांचा ताफा घुसला आणि क्षणांतच संपूर्ण वस्तीत एकच खळबळ उडाली. डोंबिवली पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्री १० वाजल्यापासून कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली धडक कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या २ इसमांना रंगेहाथ पकडले. तर गांजा सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची झोपच उडाली आहे. या कारवाईसाठी २ निरीक्षक, ६ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि ३२ अंमलदार असे एकूण ४० पोलिसांचे पथक मैदानात उतरले होते.
गल्लोगल्ली पोलीस, प्रत्येक नाक्यावर बंदोबस्त आणि संशयितांच्या घरांवर छापे, असे चित्र पाहून झोपडपट्टीत राहणारे सर्वसामान्य रहिवासी देखील अवाक् झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून झोपडपट्टीत खुलेआम सुरू असलेल्या हातभट्टीच्या धंद्याला पोलिसांनी या धाडीमुळे मोठा धक्का दिला.
दुसरीकडे गांजा ओढून नशेत धुंद असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायद्याखालीही पोलिसांनी धडक कारवाई केली. कलम ३३ (डब्ल्यू) अन्वये ४, तर कलम ११०/११७ अन्वये ५ कारवाया करण्यात आल्या.
तडीपार, वाँटेड, हिस्ट्रीशीटरांचीही कसूून तपासणी दरम्यान फरार असलेल्या आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या एकूण ८ वाँटेड आरोपींची पोलिसांनी कसून तपासणी केली. तसेच परिसरातून हद्दपार करण्यात आलेल्या ५ तडीपारांचीही झाडाझडती घेण्यात आली. याशिवाय खून, मारहाण, चोरी, घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १० जणांची यावेळी तपासणी करण्यात आली.
त्यापैकी ८ आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. यावेळी परिसरातील ८ हिस्ट्रीशीटर असलेल्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ जण सापडले. यातील कुणी पुन्हा गुन्हेगारीकडे वळला आहे का? कुणी परिसरात लपून बसला आहे का? याचा पोलिसांनी बारकाईने मागोवा घेतला. कुणी कधीही गुन्हेगारी कृत्ये केल्यास त्याची गय केली जाणार नाही, अशीही तंबी देण्यात आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
अवैध धंदेवाल्यांसह गुन्हेगारांत दहशत
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईमुळे शेलार नाका परिसरात घबराट पसरली आहे. आता पोलीस कधीही आणि कुठेही धडकतील, ही भीती गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून रोखेल, अशी या भागात कुजबुज सुरू झाली आहे. अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.